Breaking News

तळोजा वसाहतीवर सीसीटीव्हीची नजर

पनवेल : वार्ताहर

तळोजा वसाहतीची वाढती लोकसंख्या तसेच वर्षअखेर मेट्रो रेल्वे सुरु होणार असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने नजर ठेवण्यासाठी तळोजा पोलिसांच्या वतीने फेज 1 आणि 2 मध्ये दीडशे सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. तळोजा वसाहतीच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. डिसेंबर अखेरीस सिडकोकडून पेंधर ते सेन्ट्रल पार्कदरम्यान मेट्रो रेल्वे सुरु करण्यासाठी युध्दपातळीवर कामे सुरु आहेत. तळोजा वसाहतीत मेट्रो कार शेड, तळोजा आणि पेंधर मेट्रो स्थानक आहे. या शिवाय नर्सरी, पूर्व प्राथमिक तसेच शाळेच्या संख्येत वाढ होत आहे. तर काही बँकादेखील नवीन शाखा उघडण्याच्या तयारीत आहेत. तळोजा वसाहतीच्या विकासात झपाट्याने वाढ होत असल्यामुळे चोरी, घरफोडी, महिलांची छेडछाड आदी विविध गुन्ह्यांत वाढ होत आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर नजर ठेवण्यासाठी शहरातील कोपराकोपर्‍यावर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर असणार आहे. तळोजा वसाहत सुरक्षित असावी असा उद्देश समोर ठेवून तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांच्या प्रयत्नाने जवळपास पन्नास लाख रुपये खर्च करून रस्ते, चौक, वर्दळीचा परिसर शाळामहाविद्यालय, बँका, रेल्वे स्थानक परिसर आदी महत्त्वाच्या ठिकाणी दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात आहे. सदरचे काम पूर्ण करून जुलै महिन्यात सर्व कॅमेरे सुरू करण्याचे सिडकोचे प्रयत्न आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply