रस्त्यावर पाणी मारण्याची व्यवस्था करण्याची मागणी
श्रीवर्धन : प्रतिनिधी
शहरात नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी जेसीबीनेे खोदकाम केले जात आहे. जलवाहिन्या टाकून झाल्यानंतर माती पसरून खोदकाम बुजवण्यात येत आहे. त्यामुळे श्रीवर्धन शहरातील नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सत्तरच्या दशकामध्ये रानवली या गावी बांधण्यात आलेल्या पाझर तलावातून श्रीवर्धन शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी पाझर तलाव शहरापर्यंत जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. या जलवाहिन्या कास्टिंग मेटलच्या होत्या. त्यामुळे त्या वारंवार फुटण्याच्या घटना घडत होत्या. या जलवाहिन्या बदलून त्याठिकाणी नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. रानवली पाझर तलावाजवळील जलशुद्धीकरण केंद्रापासून श्रीवर्धन शहरापर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. सध्या शहरात अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी जेसीबीने अनेक ठिकाणी खोदकाम केले जात आहे. जलवाहिन्या टाकून झाल्यानंतर पुन्हा माती पसरून केलेले खोदकाम बुजवण्यात येत आहे. मात्र पसरलेल्या मातीवर पाणी मारण्यात येत नसल्यामुळे श्रीवर्धन शहरातील नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच नवीन नळजोडणी देण्यासाठी नागरिकाच्या घरापर्यंत रस्त्याच्या मधोमध खोदकाम करण्यात आले असून, त्यामध्ये खडी टाकण्यात आली असली तरीही दुचाकी चालवताना मोठ्या प्रमाणावर ती दणका बसतो. त्यामुळे अनेकांना कमरेचे व खांद्याचे आजार उद्भवण्याची स्थिती निर्माण झाली आहे. जलवाहिन्या टाकण्याचे काम जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत संबंधीत ठेकेदाराने मातीवर पाणी मारून धुरळा उडणार नाही, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ज्या जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे, अशा ठिकाणी तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.