पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील कसळखंड गावाच्या प्रवेशद्वाराजवळ अनधिकृतपणे सुरू असलेले बांधकाम थांबविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने शिवसेनेचे पोयंजे विभागीय अध्यक्ष नितीन पाटील आणि आरती पाटील यांना नोटीस बजावली आहे. असे असतानाही राजरोसपणे बांधकाम सुरूच असून पाटील दाम्पत्याने शासनाच्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे. कोन-सावळे मार्गावर कसळखंड गावाच्या बसथांब्याजवळ असलेल्या रस्त्यालगत सर्वे क्रमांक 94/1 या जागेत विनापरवाना अनधिकृतपणे आरसीसी पद्धतीचे पक्के बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी पूर्वी असलेल्या नाल्यात भराव करून तो बंद केला गेला आहे तसेच सध्याचे सुरू असलेले हे काम रस्त्यालगतच्या बिल्डिंग कंट्रोल लाइनच्या हद्दीत आहे. त्यामुळे पूर्णतः सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात शासनाच्या नियमांची पायमल्ली करून हे बांधकाम सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. गावातील पूर्वापार असलेल्या नाल्याचे पाणी या ठिकाणाहून नवकार कंपनीजवळील रस्त्यालगतच्या मुख्य पुलाच्या ठिकाणी एकत्रित होऊन वाहून जात होते, मात्र या ठिकाणी भराव झाल्याने गावातील नाल्यांचे पाणी गावातच साचून पूरस्थिती होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आणि याचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे. रस्त्याच्या मध्यभागापासून 37 मीटर पक्के बांधकाम करू नये अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे, मात्र या ठिकाणी शासनाच्या नियमांना हरताळ फासण्याचे काम होत आहे. असेच शासनाचे नियम डावलून बांधकाम होत राहिले तर पुढे आणखी नियमबाह्य बांधकामे होऊन शकतात. अशा पद्धतीच्या बांधकामांना वेळेवर रोखणे गरजेचे आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घातले असले तरी अनधिकृतपणे बांधकाम सुरूच आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाच्या नियमानुसार नितीन संभाजी पाटील व आरती नितीन पाटील यांना तत्काळ अनधिकृतपणे बांधकाम बंद करण्यास मज्जाव केला आहे. तशी सूचना त्यांना देण्यात आली असून अधिक माहिती व कार्यवाहीसाठी पनवेल तहसीलदार, पनवेल तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच कसळखंड सरपंच व ग्रामसेवक यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्र पाठविले आहे.