कोरोनाचा सर्वच क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला आहे. उद्योग, व्यापार, मानोरंजन, पर्यटन या क्षेत्रांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याची चर्चा होत असते, परंतु कोरोनामुळे क्रीडा क्षेत्राचेही नुकसान झाले आहे. हे नुकसान आर्थिक नसल्यामुळे त्यावर चर्चा होत नाही. मागील दीड वर्षात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द झाल्या. त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर होणार्या निवड चाचणी तसेच स्थानिक पातळीवरील स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. कोरोनामुळे क्रीडा स्पर्धांचे दोन हंगाम वाया गेले. क्रिकेट, खो-खो, कबड्डी, कुस्ती, कॅरम, व्हॉलीबॉल अशा विविध क्रीडा प्रकारच्या स्पर्धा होऊच शकल्या नाहीत. खेळांच्या संघटनांतर्फे घेण्यात येणार्या स्पर्धा त्याचप्रमाणे विविध गटांमध्ये खेळल्या जाणार्या शालेय स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. स्पर्धा न झाल्यामुळे अनेक उदयोन्मुख खेळाडूंची कारकीर्दच संपण्याच्या मार्गावर आहे. रायगड जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यात सर्वच खेळ खेळले जातात, परंतु कबड्डी रायगडात लोकप्रिय आहे. रायगड जिल्ह्यात सुमारे 300 कबड्डी संघ रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनला संलग्न आहेत. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे दरवर्षी खुल्या गटाच्या पुरुष व महिला, किशोर व किशोरी, कुमार व कुमारी अशा गटांमध्ये निवड चाचणी स्पर्धा खेळविल्या जातात. ज्यातून विविध गटांच्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेसाठी रायगडाचे संघ निवडले जातात. संपूर्ण राज्यातच टाळेबंदी असल्यामुळे आणि क्रीडा स्पर्धा आयोजनास बंदी घालण्यात आल्यामुळे राज्य अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्हा अजिंक्यपद स्पर्धादेखील झाल्या नाहीत. सलग दोन हंगामाच्या स्पर्धा रद्द झाल्या. प्रत्येक गटाच्या एका संघात 12 खेळाडू निवडले जातात. म्हणजे दरवर्षी सहा गटांमध्ये 72 खेळाडूंची निवड राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी होत असते. दोन निवड चाचणी स्पर्धा न झाल्यामुळे 144 खेळाडूंचे नुकसान झाले. याच पद्धतीने इतर मैदानी तसेच बैठ्या खेळांच्यादेखील विविध गटांमध्ये निवड चाचणी स्पर्धा होतात. त्यादेखील होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे या खेळातील खेळाडूंचेदेखील नुकसान झाले आहे. सर्वच क्रीडा प्रकारातील खेळांच्या निवड चाचणी स्पर्धा न झाल्यामुळे खेळाडूंचे अनेक प्रकाराने नुकसान झाले. आपली जिल्ह्याच्या संघात निवड व्हावी यासाठी खेळाडू वर्षभर मेहनत घेत असतात. निवड चाचणी स्पर्धेची वाट पाहत असतात, पण स्पर्धाच झाल्या नाहीत. स्पर्धांबरोबरच सरावासदेखील बंदी होती. त्यामुळे खेळाडू सराव करू शकले नाहीत. ज्या खेळाडूंनी वयोगटाच्या स्पर्धेत खेळण्यासाठी तयारी केली होती त्यांचे तर जास्त नुकसान झाले आहे. दोन वर्षांत या खेळाडूंचे वय दोन वर्षांनी वाढल्यामुळे ते आता त्या-त्या वयोगटांच्या स्पर्धेत खेळण्यास अपात्र ठरणार आहेत. हे खेळाडू खुल्या गटात खेळून चमक दाखवतीलच असे नाही. वयोगटात खेळणार्या खेळाडूंचे आणखी एक नुकसान झाले ते म्हणजे राज्य स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूला दहावी आणि बारावीच्या परीक्षेत 25 गुण मिळतात. तेदेखील आता या खेळाडूंना मिळणार नाहीत. हे नुकसान आर्थिक नसल्यामुळे त्याचा विचार कुणी करीत नाही. निवड चाचणी स्पर्धा तसेच शालेय स्पर्धा सलग दोन वर्षे झाल्या नाहीत. त्यामुळे किशोर व कुमार वयोगटांच्या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचण्याची क्षमता असलेल्या काही उदयोन्मुख खेळाडूंची कारकीर्दच संपल्यात जमा आहे. कारण हे खेळाडू भविष्यात खुल्या गटात खेळून राष्ट्रीय स्पर्धांपर्यंत पोहचतीलच असे नाही. स्पर्धाच नसेल तर खेळाडूंचा कस लागत नाही. त्याला आपले क्रीडानैपुण्य दाखवता येत नाही. त्याचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर होत असतो. निवड चाचण्यांबरोबरच स्थानिक पातळीवरील स्पर्धांमध्ये खेळून हे खेळाडू आपली चमक दाखवत असतात. या स्पर्धांमधील कामगिरीचादेखील अनेक वेळा संघ निवडताना विचार केला जातो. तसेच या स्थानिक स्पर्धांमध्ये रोख रकमेची बक्षिसे दिली जातात. यातून खेळाडूंना तसेच संघांना आर्थिक कमाई करण्याची संधी असते. या स्पर्धादेखील झाल्या नाहीत. एकट्या कबड्डीचा विचार केला तर दर शनिवार व रविवारी तसेच इतर सुटीच्या दिवशी रायगड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एकतरी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित केली जाते. दरवर्षी या स्पर्धांमधून रायगड जिल्ह्यात करोडो रुपयांची उलाढाल होत असते. दोन हंगाम स्थानिक स्पर्धाच होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे खेळाडू तसेच संघांचे आर्थिक नुकसानदेखील झाले. केवळ कबड्डीच नाही तर इतर खेळांच्यादेखील स्थानिक स्पर्धा न झाल्यामुळे त्या खेळातील खेळाडूंचेदेखील सर्वच बाबतीत नुकसान झाले आहे. खेळाडूंबरोबरच स्थानिक पातळीवर स्पर्धा आयोजित करणारे संघ, प्रत्येक खेळाच्या जिल्हा संघटना, विविध क्रीडा प्रकारातील खेळांचे पंच, स्पर्धा अयोजनासाठी आवश्यक असणारे साहित्य पुरवणारे या सर्वांचेच कोरोनामुळे नुकसान झाले आहे.
-प्रकाश सोनवडेकर, अलिबाग