Breaking News

वंजारवाडी येथे तलाठी कार्यालयातील कर्मचार्याला मारहाण

कर्जत पोलीस ठाण्यात वाळू माफियावर गुन्हा दाखल

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील वंजारवाडी येथे पेज नदीमध्ये वाळू उत्खनन सुरू असताना भालीवडी तलाठी कार्यालयातील  कर्मचार्‍याने त्याबद्दल जाब विचारला, त्यावेळी वाळू माफियाने त्या कर्मचार्‍याला मारहाण करण्याची घटना सोमवारी (दि. 15)घडली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जत तालुक्यातील भालीवडी तलाठी कार्यालयाच्या हद्दीत वंजारवाडी येथे पेज नदीच्या कोरड्या पात्रात जेसीबी मशीनच्या सहाय्याने वाळू उत्खनन केले जात असल्याची माहिती महसूल विभागाच्या कडाव मंडळ अधिकार्‍यांना मिळाली होती. त्याबाबत मंडळ अधिकारी यांनी सोमवारी दुपारी चार वाजता भालीवडी तलाठी  कुणाल राठोड यांना फोनवरून वाळू उत्खनन केले जात असल्याची माहिती दिली आणि घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. त्यावर तलाठी राठोड यांनी कारकून सुरेश सोनू मुकणे यांना वंजारवाडी येथे जाण्यास सांगितले. त्यानुसार सुरेश मुकणे हे दुचाकी घेऊन वंजारवाडी येथे पोहचले. त्यावेळी तेथे नदीमधील पाणी नसलेल्या कोरड्या जागेत जेसीबी मशीनच्या सहाय्याने वाळू उत्खनन सुरू होते आणि वाळू ट्रॅक्टरमध्ये भरण्यात येत होती. तेथील वाळू उत्खनन करणार्‍या व्यक्तीला तुम्ही कोणाच्या परवानगीने वाळू उत्खनन करीत आहात, अशी माहिती सुरेश मुकणे यांनी विचारली. त्यावर वाळू उत्खनन करणारे अशोक अरुण काळोखे (रा. टाकवे) यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे वाळू उत्खनन थांबविण्याची सूचना  मुकणे यांनी काळोखे यांना केली, परंतु काळोखे हे वाळू उत्खनन करतच होते. ही माहिती मुकणे यांनी तलाठी कुणाल राठोड यांना फोनवरून दिली. त्याचा राग येवून बेकायदा वाळू उत्खनन करणारे अशोक काळोखे यांनी कर्मचारी सुरेश सोनू मुकणे यांना हाताने मारहाण केली.

या प्रकरणी कर्मचारी सुरेश सोनू मुकणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अशोक काळोखे यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात भादवी कलम 353,352,504खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सोनावणे करीत आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply