Breaking News

वारीबंदीवरून राज्य सरकारचा निषेध

वारकरी आणि विहिंपचे पनवेल तहसीलदारांना निवेदन

पनवेल : साहिल रेळेकर

विश्व हिंदू परिषद आणि वारकरी संप्रदाय पनवेल प्रखंड यांच्या वतीने पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांना शनिवारी (दि.17) विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले.

आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी महाराष्ट्रातून लाखो वारकरी पायी पंढरपुराला जात असतात, मात्र गेल्या वर्षापासून कोरोनामुळे सर्वांनीच समजुतदारपणे पायी वारीचे आयोजन केले नाही. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात जाणवत असल्याने सर्व नियम पाळून वारकर्‍यांनी पायी वारी करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीदेखील हिंदुधर्म विरोधक सरकारने यावर्षी पायीवारीवर पुन्हा बंदी घातली आणि एवढेच नव्हे तर ज्येष्ठ कीर्तनकार हभप  बंडातात्या कराडकर यांनाही अटक केली. अशा प्रकारे वारकर्‍यांची प्रत्येक ठिकाणी अडवणूक केली जात आहे, असे वारकर्‍यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

संविधानाने नागरिकांना दिलेला उपासना करण्याचा अधिकार आणि मुलभूत स्वातंत्र यांना कोणी अडवू शकत नाही असे म्हणत अनेक वारकर्‍यांनी राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवला. या धोरणांविरुद्ध विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि वारकरी सांप्रदाय यांच्या वतीने पनवेल तहसीलदार कार्यालयाबाहेर सरकारचा निषेध करण्यात आला.

तहसीलदार कार्यालय पनवेल येथे नायब तहसीलदार संजीव मांडे यांच्याकडे निवेदन देताना अखिल भारतीय वारकरी मंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धनाजी महाराज पाटील, पुंडलिक महाराज फडके, विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रखंड संयोजक सुभाष कडव, विठ्ठल रुक्मिणी पायी कोकण दिंडी चालक सुरेश महाराज पाटील, श्री.संत चांगा वटेश्वर पालखी सोहळ्याचे संचालक वसंत महाराज दुर्गे, विश्व हिंदू परिषद बजरंग दल पनवेलचे संजय उलवेकर, गुरुनाथ मुंबईकर आदी वारकरी उपस्थित होते.

ब्रिटिश आणि मुघल शासनाने जे कृत्य केले नाही ते महाराष्ट्र सरकारच्या काळात झाल्याने दिंडी स्वरूपात निषेध मोर्चा काढून पनवेल तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आले. सद्यस्थितीत लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम, सरकारी कार्यालये, अंत्ययात्रा आदींना विविध निर्बंध आखून परवानगी दिली जाते तर मग राज्य सरकार वारी का खंडित करीत आहे. आम्हीदेखील सर्व सूचना आणि निर्बंधांचे पालन करू, परंतु सरकार परवानगी न देता वारकर्‍यांची परंपरा खंडित करीत असल्याने सरकारच्या या धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

-सुभाष कडव, विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रखंड संयोजक

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply