Breaking News

घोटाळेबाजांची पाठराखण करण्याचे पाप राज्यातील ठाकरे सरकार करतेय : किरीट सोमय्या

कर्नाळा बँक घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी मौन सोडणार?

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कर्नाळा बँक घोटाळ्याने 60 हजार लोकांचे आयुष्य देशोधडीला लागले, मात्र तरीही महाविकास आघाडी सरकार बघ्याचीच भूमिका घेऊन आजपर्यंत ठेवीदारांकडे दुर्लक्ष करीत आली असून कर्नाळा बँक घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी मौन सोडणार, असा सवाल सुप्रसिद्ध सनदी लेखापाल, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शनिवारी (दि. 21) येथे पत्रकार परिषदेत केला.
ठेवीदारांच्या हितासाठी केंद्र सरकारने कारवाई केली, मात्र ठाकरे सरकारने कर्नाळा बँक आणि शेकापला वाचवण्यासाठी अद्याप या घोटाळ्यात कुठलीच कारवाई केली नाही, असे सांगून ठाकरे सरकारने ठेवीदारांच्या प्रश्नाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले असले तरी ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळेपर्यंत आमचा संघर्ष कायम असेल, असे सोमय्या यांनी या वेळी नमूद केले.
कर्नाळा नागरी सहकारी बँकेत घोटाळा झाल्यापासून ठेवीदार, खातेदारांना न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेतून सतत खंबीरपणे कार्यरत असलेल्या कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, नगरसेवक हरेश केणी, नगरसेवक बबन मुकादम, ओबीसी सेलचे एकनाथ देशेकर, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक काटकर आदी उपस्थित होते. तत्पूर्वी याच ठिकाणी शेकडो ठेवीदारांची बैठक झाली. या लढ्यात विशेष मार्गदर्शन करून सातत्याने ठेवीदारांच्या पाठीशी उभे राहणारे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा ठेवीदारांनी सत्कार करून आभार मानले.
पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी सांगितले की, विवेक पाटील यांची 234 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे आणि 65 दिवस ते जेलमध्ये आहेत. ही कारवाई ईडीने केली आहे, मात्र महाराष्ट्र सरकारने तसूभरपण कारवाई केली नाही. कॉपरेटिव्ह अ‍ॅक्टप्रमाणे कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारचे आहेत, असे खासदार शरद पवार सांगतात. मग राज्य सरकार का गप्प आहे? शरद पवार साहेब कर्नाळा बँकेसंदर्भात आपण कधी बोलणार? हे राज्य सरकार घोटाळेबाजांचे आहे. मी या सरकारचे अनेक घोटाळे उघड केले. अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांचे घोटाळे आता सर्वश्रूत झाले आहेत. त्यामुळे माझ्यावर काल शिवसेनेकडून हल्ला करण्यात आला. मी त्याबद्दल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. माझ्यावर कितीही हल्ले होऊ द्या घोटाळेबाजांना सोडणार नाही.
ईडीने मनी लॉण्डरिंगमुळे विवेक पाटलांना जेलमध्ये टाकले आहे, मात्र ठाकरे सरकारने कोणतीच कारवाई राज्य शासन म्हणून केली नाही ही अत्यंत चुकीची बाब असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाळा बँकेवर कारवाई करून नये असे निर्देश दिल्यामुळेच राज्य सरकारकडून कारवाई झाली नाही, असा आरोप सोमय्या यांनी केला.उद्धव ठाकरे घोटाळेबाजांना सपोर्ट करण्याचे, तर मोदी सरकार घोटाळेबाजांना जेलमध्ये टाकण्याचे काम करीत असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले तसेच ईडी जर विवेक पाटलांना अटक करू शकते तर राज्य सरकार कुठलीच कारवाई का करीत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. येत्या 90 दिवसांत म्हणजेच दिवाळीपर्यंत पाच लाखांच्या आतील रक्कम असलेल्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळतील आणि त्यासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा असून येत्या आठवड्यात त्याचा रितसर फॉर्म पनवेलमध्ये उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, कर्नाळा बँकेत पाच लाखांपेक्षा कमी रक्कम असलेले 49,423 ठेवीदार आहेत आणि त्यांची एकूण रक्कम 240 कोटी आहे आणि ती केंद्र सरकारच्या निर्णयांनुसार विमा संरक्षणाच्या माध्यमातून परत मिळणार आहे, तर पाच लाखांपेक्षा जास्त रक्कम असलेले 2251 ठेवीदार असून त्यांचे 294 कोटी रुपयांची ठेवी आहे. केंद्राच्या निर्णयाचे क्रेडिट शेकाप घेऊ पाहत आहे. मग उर्वरित ठेवीदारांचे 294 कोटी रुपये शेकाप नेते देणार का, असा सवाल आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित करून 294 कोटी रुपये ठेवीदारांना देण्याचे एकाअर्थी शेकापला चॅलेंज दिले आहे.
आमदार महेश बालदी म्हणाले की, महाविकास आघाडीतील एकाही नेत्याने ठेवीदारांसाठी संघर्ष केला नसून कर्नाळा घोटाळ्याला पाठीशी घालणार्‍या तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना ठेवीदारांचा शाप लागला आहे. म्हणून त्यांच्यावर ही वेळ आली आहे.
दरम्यान, रिझर्व्ह बँकेने आता कर्नाळा बँकेचा व्यवसाय परवाना ‘बँकिंग बिझनेस इन इंडिया अंडर रेग्युरेशन 22 सेक्शन 56, रेग्युरेशन अ‍ॅक्ट 1949’नुसार रद्द करीत असल्याची अधिसूचना जारी केल्यामुळे कर्नाळा बँकेत ठेवलेल्या रकमेपैकी पाच लाखापर्यंतच्या ठेवी (डीआयसीजीसी) रिझर्व्ह बँक ठेवी विमा संरक्षण व क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या नव्या नियमानुसार ठेवीदारांना परत मिळणार आहेत. त्याचे श्रेय घेण्यासाठी शेकापच्या नेत्यांनी ठेवीदारांना तुमच्या ठेवी परत देत आहोत. त्यासाठी तुमची माहिती भरून द्या, असा मेसेज पाठवला आहे. बँकेत भ्रष्टाचार करून आता आम्हीच तुमचे पैसे परत देत आहोत हे सांगणे म्हणजे, ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ असा आव आणण्याचा केविलवाणा प्रयत्न शेकाप नेत्यांचा सुरू असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारने ठेवीदारांच्या दृष्टिकोनातून मोठा दिलासा दिला आहे, मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार याकडे जाणूनबुजून सुरुवातीपासून दुर्लक्ष केले आहे.
मोदी सरकारमुळेच पाच लाखांपर्यंतची रक्कम ठेवीदारांना मिळणार -आमदार प्रशांत ठाकूर
आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी बोलताना सांगितले की, 28 सप्टेंबर 2019 रोजी पहिल्या दिवसापासून माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाळा बँक घोटाळ्याविरोधात लढाई सुरू झाली. घोटाळ्याचे आरबीआयला पत्र व त्याचा पाठपुरावा, रिझर्व्ह बँकेवर मोर्चा, कर्नाळा बँकेवर मोर्चा, सीआयडी, पोलीस आयुक्त, सहकार, ईडी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्या वेळी अनेकांना बँकेत घोटाळा झाल्याचे मान्य नव्हते. विवेक पाटील यांनी तर छातीठोकपणे घोटाळा झालाच नाही, मी पैसे खाल्ले असेल तर स्वतःला जाळून घेईन, असा स्पष्ट निर्वाळा दिला होता. राजाचे राजपण आजपण आणि उद्यापण असे बॅनरबाजी करून शेकापच्या नेत्यांनी अकलेचे तारे तोडले होते. आता मोदी सरकारच्या निर्णयामुळे पाच लाखांपर्यंत पैसे सुरक्षा म्हणून मिळणार आहेत, मात्र शेकाप लोकांचे पैसे परत देतोय असा संदेश शेकापकडून प्रसारित केला जात आहे.
बाळाराम पाटलांचे निर्लज्ज वक्तव्य म्हणजे ठेवीदारांचा अपमान -आमदार महेश बालदी
आमदार महेश बालदी म्हणाले की, विवेक पाटील जेलबाहेर आल्यावर फटाके वाजवणार असे आमदार बाळाराम पाटील यांनी मेळाव्यात म्हटले. ज्याने 60 हजार लोकांना देशोधडीला लावले त्यांच्यासाठी फटके फोडण्याचे निर्लज्जपणे वक्तव्य करणे म्हणजे ठेवीदारांचा अपमान आहे. या घोटाळ्याची तक्रार नोंद झाली तेव्हापासून महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मूग गिळून गप्प बसले आहेत. शेकापने बँक बुडवली, मात्र त्यांना महाविकास आघाडी सरकारने सपोर्ट केला. त्यामुळेच आतापर्यंत ठाकरे सरकारकडून कोणतीच कारवाई झाली नाही. ईडीने कारवाई केली. प्रॉपर्टी जप्त केली, पण राज्य सरकारने बँकेचे हेमंत सुताने आणि संचालकांवर अद्यापपर्यंत अटक कारवाई का केली नाही, असा सवालही त्यांनी या वेळी केला.  
शेकाप नेते तेव्हा कुठे लपून बसले होते?
कर्नाळा बँकेच्या घोटाळ्यामुळे अनेकांना नितांत गरजेच्या वेळी पैसे मिळाले नाहीत. उपचार, लग्न, आजार अशा महत्वाच्या वेळी स्वतःचे पैसे असतानाही ते न मिळणे यासारखी दुर्देवी बाब नाही. ग्रामपंचायतींचेही कोट्यवधी रुपये विवेक पाटील यांनी गिळंकृत केल्याने अनेक गावांचा विकास खुंटला आहे. उपचाराअभावी अनेक जण मृत्यूच्या दारात आले. त्या वेळीही विवेक पाटील यांनी दमडी न देता फक्त फुशारक्या मारल्या. त्यामुळे अनेक जणांना नाहक प्राण गमवावे याची जबाबदारी शेकाप घेणार का?  ‘बँक व्यवस्थित आहे’ असा यापूर्वी आव आणणारे आणि कालांतराने बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अटक झाल्यानंतर ‘आम्ही सगळे पैसे परत करू आणि मग फटाके वाजवू’ असे म्हणणारे आमदार बाळाराम पाटील आता शेकापची उरलीसुरली लाज वाचवण्यासाठी पुन्हा आपल्याच कार्यकर्त्यांना कामाला लावून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याची चर्चा पनवेलकरांमध्ये आहे. मुळातच कर्नाळा बँकेचा एवढा मोठा घोटाळा झाला असताना त्या वेळी शेकापची नेतेमंडळी कुठे लपून बसली होती, असा सवालही या निमिताने उपस्थित झाला आहे.  

Check Also

पनवेलमधील विजेचा प्रश्न निकाली

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दोन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील छत्रपती …

Leave a Reply