जोरदार पाऊस आणि मुंबईची तुंबई हे समीकरण वाईट अर्थाने रूढ झालेले आहे. दरवर्षी मुंबई महापालिका पावसाळ्याआधी नालेसफाईचे दावे करते आणि धुवाँधार पावसात ते वाहून जात असतात. आताही तेच झाले. याहून गंभीर म्हणजे मुंबईत घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये सुमारे 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये असुरक्षिततेची भावना व्यक्त होत आहे.
कोट्यवधी रुपयांचे बजेट असलेली मुंबई महापालिका म्हणजे मिनी मंत्रालय मानले जाते. देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याची मुख्य राजधानी असलेल्या मुंबापुरीत विविध क्षेत्रांमध्ये मोठी उलाढाल होत असल्याने महापालिकेच्या तिजोरीतही बराच महसूल जमा होत असतो. त्या बदल्यात महापालिकेने नागरिकांना विविध सोयी-सुविधा पुरविणे क्रमप्राप्त असते, मात्र साध्या मूलभूत सोयींपासून मुंबईकर वंचित राहत असल्याचे दिसून येते. विशेषत: पावसाळ्यात निसर्ग सारी पोलखोल करतो. मुंबई महापालिकेकडून मान्सूनपूर्व नाले, गटार सफाईवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. या कामाचा मोठा गाजावाजाही केला जातो, मात्र तरीही जोरदार पावसात मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचून तुंबई का होते याचे कोडे अद्याप मुंबईकरांना उलगडलेले नाही. मुसळधार पावसात काही ठिकाणी पाणी साचले तर आपण समजू शकतो, मात्र ही मायानगरी जवळपास पूर्णत: जलमय होते. मग वाहतुकीवरही याचा परिणाम होत असतो. एकंदर सारे काही ठप्प होते. हा प्रकार दरवर्षी होत असल्याने त्यावर ठोस उपाययोजना करणे अपेक्षित आहे. यावर दूरदृष्टी आणि अचूक नियोजनातून सुयोग्य कृती आवश्यक आहे, पण कसले काय इतर आठ महिने त्याकडे विशेष लक्ष नसते. पावसाळा जवळ आला की धावाधाव सुरू होते. समस्यांवर तात्पुरती मलमपट्टी केल्याने त्या पुन्हा निर्माण होतात आणि त्याचा नाहक मनस्ताप मुंबईकरांना होतो. आताच्या पावसात तीन ठिकाणी दुर्घटना घडून 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. चेंबूर भागात दरड भिंतीवर कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला, तर विक्रोळीत सात लोक मृत्युमुखी पडले आहेत. बचावकार्य अजूनही सुरू असून काही नागरिक ढिगार्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याचबरोबर भांडूपमध्ये संरक्षक भिंत कोसळून एका 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत घडलेल्या दुर्घटनांवर बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आम्ही त्या नागरिकांना धोक्याचा इशारा दिला होता, अशी प्रतिक्रिया दिली आहे. प्रशासनाने आपली औपचारिकता पूर्ण केलीही असेल. त्यात शंका घेण्याचे कारण नाही, पण धोक्याच्या सूचनेबाबत इशारा देऊनही नागरिक घराबाहेर पडायला तयार नाहीत याचा अर्थ त्यांचा तुमच्यावर विश्वास नाही. महापालिकेकडून पावसाळ्यात योग्य पद्धतीने स्थलांतर होईल याबद्दल त्यांच्या मनात शंका असल्यानेच ते घराबाहेर पडले असे म्हणण्यास निश्चित वाव आहे. अर्थात, नागरिकांनीही अशा प्रकारे स्वत:चा जीव धोक्यात टाकायला नको होता, पण दरवर्षी घडणार्या दुर्घटना आणि पाणी साचून विस्कळीत होणारे जनजीवन लक्षात घेता महापालिका आपला कारभार कधी सुधारणार? कर्तव्य कधी चोखपणे बजावणार? आता या विषयांवर चर्चा होईल, संवेदना व्यक्त होईल, झालीच तर एखादी घोषणाही होईल, पण त्याची नंतर अंमलबजावणी होईल का हा खरा प्रश्न आहे. तोपर्यंत मुंबईकर असुरक्षितच आहेत.