ग्राहक नसल्याने माल पडून
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबईसह मुंबई उपनगरात सलग दोन दिवसांपासून पडणार्या मुसळधार पावसाने वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा, फळे, भाजीपाला आणि धान्य बाजारांत मुंबईतील ग्राहक फिरकले नसल्याने बाजारात शुकशुकाट होता. भाजीपाला व फळ बाजारात शेतमालाची आवक जास्त आहे, मात्र बाजारात ग्राहक नसल्याने मालाला उठाव नाही.
एपीएमसी बाजारातील जवळजवळ 80 टक्के ते 90 टक्के भाजीपाला मुंबई उपनगरात विक्रीसाठी जात असतो. भाजीपाला बाजारात दररोज 600 ते 650 गाड्या दाखल होत असतात. सोमवारी भाजीपाल्याच्या 635 गाड्या दाखल झाल्या होत्या. मात्र मालाला उठाव नसल्याने जवळपास 40 टक्के माल शिल्लक राहिला. त्यामुळे भाज्यांच्या दरांत 20 ते 30 टक्के घसरण झाली.
फळबाजारात सीताफळाचे चार ते पाच टेम्पो, तर डाळिंबाचे 10-12 टेम्पो आवक झाली. बाजारात मुंबईतील 70 टक्के ग्राहक नव्हते. सध्या बाजारात परदेशातील सफरचंदाचा हंगाम सुरू असून त्याची आवक व पुरवठा मागणीनुसार होत असतो. त्याचबरोबर बाजारात तुरळक प्रमाणात डाळिंब, चेरी, पेर यांचा हंगाम सुरू आहे. दरवर्षी पावसाळ्यात फळबाजारात व्यापार कमी असतो. त्यामुळे फळांच्या बाजारावर परिणाम झालेला नसून बाजारभाव स्थिर आहेत, अशी माहिती व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली. धान्य बाजारात 150 गाडी आवक झाली असून बाजारात ग्राहकच फिरकले नाहीत.
सततच्या पावसामुळे नवी मुंबई शहरासह वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतही पाणी साचले होते. बाजार आवारात तसेच मुख्य प्रवेशद्वारावर पाणी तुंबल्याची माहिती व्यापार्यांनी दिली. एपीएमसीमधील बाजार समिती ही मुख्य रस्त्यालगत आहे. मुख्य रस्त्यावरील नाले, गटारे उंच भागात आहेत, तर बाजार परिसर सखल भागात आहे. त्यामुळे बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वार व परिसरात पाणी साचले होते. भाजीपाला व फळ बाजारात नाशिवंत माल खाली होत असतो. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरानिर्मिती होत असते. बाजारात सायंकाळी कचरा उचलला जातो. पावसाचे पाणी साचत असल्याने बाजारात अस्वच्छता पसरली होती.
कांदा-बटाटा बाजार समितीत 99 गाड्या कांद्याची आणि 54 गाड्या बटाट्याची आवक झाली, मात्र बाजारात उपनगरातील 40 ते 50 टक्के ग्राहक खरेदीला आलेला नव्हता. त्यामुळे 65 गाड्या बाजारात शिल्लक राहिल्या आहेत. बाजारभाव मात्र स्थिर असून कांदा प्रतिकिलो 15 ते 20 रुपयांवर आहे, तर पावसामुळे बटाटा खराब होत आहे. शेतमालाची आवक कमी झाली नसून मुंबईतील येणारा ग्राहक मात्र पावसामुळे बाजारात फिरकला नाही, अशी माहिती व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली आहे.