Tuesday , February 7 2023

उल्हास नदीवर नवीन पुलाची प्रतीक्षा

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यात तीन दिवस सतत झालेल्या संततधार पावसामुळे अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. उल्हास नदीवरील दहिवली पूल दरवर्षी महापुराच्या पाण्याखाली जात असून 45 वर्षे वयोमान असलेल्या या पुलाच्या जागी नवीन पूल कधी होणार? असा प्रश्न स्थानिक लोक विचारत आहेत. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंते यांनी दहिवली पुलाची पाहणी केल्याने स्थानिकांच्या नवीन पुलाच्या मागणीला यश मिळण्याची शक्यता आहे.

1976 साली दहिवली पुलाला मंजुरी मिळाली होती. नेरळ-कळंब या राज्यमार्ग रस्त्यावरील दहिवली पुलाचे बांधकाम होऊन 45 वर्षे इतका मोठा कालावधी लोटला आहे. उल्हास नदीवरील या पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी महापुराचे पाणी पुलावरून जात असते. 2019 मध्ये तब्बल 36 तास या पुलावरून पाणी वाहत होते, या वर्षी देखील 24 तासांहून अधिक काळ महापुराचे पाणी वाहत होते. त्यामुळे पुलाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यात पुलाच्या सहा पिलरची यापूर्वी दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आणखी किती वर्षे हा पूल परिसरात असलेल्या 30 गावांतील वाहनांची वाहतूक सहन करणार, असा प्रश्न स्थानिक रहिवासी आणि दहिवली ग्रामपंचायतीचे सरपंच चिंधु तरे यांनी उपस्थित केला आहे.

सतत तीन दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे दहिवली पूल धोकादायक झाला आहे. त्यात शासन निधी उपलब्ध करीत नसल्याने तीन वर्षांपूर्वी अंदाजपत्रक बनविण्यात आलेल्या उल्हास नदीवरील दहिवली पुलाच्या जागी नवीन पूल अद्याप तरी बांधला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन पूल बांधण्यासाठी 12 कोटीचे अंदाजपत्रक तयार केले होते. त्याचे काय झाले, असा प्रश्नही कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ धुळे यांनी उपस्थित केला आहे.

दहिवली पुलाचे काम सुरू होण्याची गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षा सुरू आहे. त्याबद्दल स्थानिकांनी पुलाची पाहणी करण्यासाठी आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांपुढे प्रश्न उपस्थित केला. बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजाराम गोसावी आणि कार्यकारी अभियंता रत्नाकर बामणे यांनी दहिवली पुलाची पाहणी केल्यानंतर पुलाला पावसाचा धोका किती आहे? याचा अहवाल सादर करण्याची सूचना उपअभियंता अजयकुमार सर्वगोड यांना अधीक्षक अभियंता गोसावी यांनी केली आहे.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply