’रामदास म्हणे आता। सांडूनी रामाची कथा। आणीक सर्वथा। चाड नाही रे॥ ’पंढरपूरची वारी करण्यास रामभक्त असलेले समर्थ काहिसे अनुत्सूक असताना विठ्ठलपंत नावाचे वृध्द समर्थांकडे आले आणि पंढरपूरचे उपाध्ये असल्याचे सांगून त्यांना पंढरपूरला सोबत करण्याची विनंती करू लागले. हा प्रसंग 1571 मध्ये अधिक आषाढ महिन्यातील असल्याचा उल्लेख समर्थ वाङमयामध्ये दिसून येतो. समर्थांनी विठ्ठलपंतांना,
’आम्हा नाही चाड।
ते कोणायेकाची। दृढराघवाची। कास धरू॥’
असे सुनावून या आग्रहापासून परावृत्त करू पाहात असताना विठ्ठलपंतांनी समर्थांना पंढरीस मुख्य दैवत मारूतीराया असल्याचे सांगून पंढरपूर वारीसाठी त्यांचे मन वळविले. पंढरपूरमधील मारूतीरायाचे दर्शन घेतानाच विठ्ठलपंत अदृश्य झाले. समर्थांनी मारूतीरायाचे दर्शन घेऊन नगरप्रदक्षिणेमध्ये वारकर्यांसोबत सहभाग घेतला आणि वाळवंटामध्ये ध्यान करीत असताना त्यांना मारूतीरायाने दर्शन दिले. समर्थांनी प्रार्थना करताच मारूतीरायांनी विठ्ठलास रामरूप घेण्यास विनविले. समर्थांच्या भक्तीमुळे विठ्ठलाचे रामरूप, पंढरपूरचे आयोध्या रूप आणि चंद्रभागा शरयू रूपांतून दिसून क्षेत्रपालट झाल्याने सर्वच साधूसंत अचंबित झाले आणि सर्वांनी पंढरपूरचा क्षेत्रमहिमा कायम राहण्याची विनंती समर्थांस केली. त्यानुसार पंढरपूरास दर्शन करताना समर्थांनी श्रीपांडूरंगास विनविले,’
येथे उभा का श्रीरामा
मनमोहन मेघशामा।
चाप बाण काय केले।
कर कटावरी ठेविले॥
का धरिला अबोला।
दिसे वेष पालटला॥
काय जाली आयोध्यापुरी।
येथ वसविली पंढरपुरी॥
काय केली शरयूगंगा।
येथे आणिली चंद्रभागा॥
काय केले वानरदळ।
येथे मेळविले गोपाळ॥
दिसे हनुमंत येकला।
हा का सैन्यातुनि फुटला॥
काय केली सीतामाई।
येथे राहि रखमाबाई॥
रामदासी जैसा भाव।
तैसा जाला पंढरीराव।’ समर्थांच्या या अभंगातील विनंतीनंतर सारे पंढरपूर पूर्ववत् झाले.
समर्थ गाथेमध्ये,
’पंढरी ऐसे तिन्ही ताळी।
क्षेत्र नाही भूमंडळी॥
दुरूनी देखता कळस।
होय अहंकाराचा नाश॥
होता संताचिया भेटी।
जन्ममरणा पडे तुटी॥
चंद्रभागेमाजी न्हाता।
मुक्ती लाभे सायुज्यता॥
रामदासा जाली भेटी।
विठ्ठल पायी दिधली मिठी॥’
हे 39 व्या ओवीत म्हटले आहे.
42 व्या ओवीमध्ये,
’राम अयोध्येचा वासी। तोचि नांदे द्वारकेसी॥
कृष्ण नमाते धरिले। बहु दैत्य संहारिले॥
सखया मारूतीलागुनी। रूप दावी चापपाणी॥
पुढे भूभार उतरीला। पांडवासी साह्य जाला॥
आत भक्तांचियासाठी। उभा चंद्रभागेतटी॥
राम तोचि विठ्ठल जाला। रामदासासी भेटला॥’
हे समर्थांचे रामभक्तीरूप विठ्ठलदर्शन प्रकटले आहे.
46 व्या ओवीमध्ये,
’जे का चैतन्य मुसावले। विटेवरी विसावेल। तो हा विठ्ठल उभा राहे। समचरणी शोभताहे॥’
47 व्या ओवीत
’पंढरपुरी मनोरथ ज्याचा। धन्य धन्य तो दैवाचा। जो जो पंढरीस गेला। तेणे कळीकाळ जिंकिला॥ रामदास म्हणे पंढरी। नाना साधनेवीण तारी॥’
असे पंढरपूर माहात्म्य समर्थांनी वर्णिले आहे.
51व्या ओवीतही-
’मुकूटी मयूरपत्रे तुरंबिली।
विट नीट असे ठाकली। रामदासाची माऊली।
भक्तालागी उभी असे॥’ तर 52 व्या ओवीत ’काही बोल रे विठ्ठला।
मौन वेष का धरिला। काय मागतो गाठोडी। बोलसी पा धरिली गुढी॥ आशा वैभवाची। भिऊ नको वद काही॥ नलगे मज धन दारा।
वेगे लोचन उघडा।
दास म्हणे वर पाहे।
कृपा करूनी भेटावे॥’
अशी समर्थांची विठ्ठलास विनवणी झाली आहे.
’देह हे पंढरी आत्मा पंढरीराव। यात्रा महोत्सव सर्वकाळ।’ असे समर्थांनी 56 व्या ओवीमध्ये स्वगत केलेले दिसते. त्यानंतरच्या ओवीत समर्थांना चक्क विठ्ठलामध्ये आत्म्याचे दर्शन घडल्याचे ते व्यक्त करतात,
’ आम्ही देखिली पंढरी। सच्चिदानंद पैलतिरी॥रामदासी दर्शन जाले। आत्म्या विठ्ठलाते देखिले॥’ यानंतर तर समर्थ रामदासस्वामी विठ्ठलमय झालेले दिसतात…ते पुढील ओवीतच म्हणतात..
’विठोबा तु आमचे कुळदैवत। आम्ही अनन्य शरणागत॥
तुझे पायी असे चित्त। जीवी आर्त भेटीचे॥
धावे पावे विठो माये। उडी घाली लवलाहे॥
भेटावया जीव फुटो पाहे। खंती देही न समाये॥
रामदास बाहे करूणवचनी।
धावे बाह्या पसरोनी॥
अश्रू दाटले लोचनी।
आलिंगनी पातली॥’
दासगाथेतील हा विठ्ठलस्तवनाचा समर्थकृत भाग आजही समर्थभक्तांनी नियमित वारी करावी, इतपत प्रेरणादायी नक्कीच आहे. दासगाथेच्या अखेरिस 1372 व्या ओवीमध्ये समर्थांनी
’तुम्ही आम्ही रामदास एकचि।
देव एकचि हा नाना वेषधारी।
रे सखया। लटिके म्हणसी तरी तुझा देव। माझा होऊनी मज हृदयी धरी। रे सखया॥’
असे म्हणून या ओवीद्वारे विठ्ठलभक्तीची अनुभूतीच प्रकट केली आहे.
समर्थांनी बाडांक 1497 मध्ये श्रीविठ्ठलप्रेमदर्शक एक सुंदर अप्रतिम अभंग रचला आहे.
’वैकुंठीचा राणा उभा विटेवरी। पुंडलिकद्वारी पंढरीसी॥ अठ्ठावीस युगे पाऊले समान। तिष्ठे नारायण भक्तासाठी॥
कटावरी दोन्ही ठेवियले कर। रखमाई सुंदर वामभागी॥ कीर्तनाचे वेळी उभा पाठी राहे। सदा वाट पाहे संतभेटी॥
राखियेला धर्म दृष्ट निर्दाळोनी। तारितो निर्वाणी नाम घेता॥ माध्यान्ही सुरवर भेटी येती त्याचे।स्नान भीवरेचे करीती नित्य॥
ऐसे क्षेत्र अन्य भूमी नाही दुजे। भक्ताचिये काजे उतावेळ॥ आनंदले मन पाहता लोचन। मूर्ति ध्यानी मने आठवीता॥
(उत्तरार्थ पुढील गुरुवारी)
-शैलेश पालकर, खबरबात