Breaking News

देशात कोरोनाचा वाढता संसर्ग

24 तासांत तब्बल 34,884 नवे रुग्ण; 671 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढतच चालला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 18) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये 34 हजार 884 नव्या रुणांची नोंद झाली असून, 671 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे 22 हजार 942 रुग्ण बरे झाले. बरे होण्याचे प्रमाण 63.33 टक्के झाले आहे.
देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 लाख 38 हजार 716वर पोहोचली आहे. मागील 20 दिवसांमध्ये तब्बल पाच लाख रुग्णांची वाढ झाली आहे. देशात 29 फेब्रुवारीला पहिला रुग्ण आढळल्यानंतर रुग्णसंख्या पाच लाखांवर जाण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागला. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 26 हजार 273 जणांचा मृत्यू झाला आहे. अशा कठीण प्रसंगी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात ज्या वेगात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याहूनही अधिक वेगात रुग्ण कोरोनावर मात करीत आहेत. सध्या तीन लाख 58 हजार 692 जणांवर उपचार सुरू आहेत, तर सहा लाख 53 हजार 751 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
देशात दहा लाखांमागे 727 कोरोना रुग्ण असून, जगाच्या सरासरीपेक्षा हे प्रमाण चार ते आठ पटीने कमी आहे. दहा लाखांमागे 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण जगात सर्वांत कमी आहे,  असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अहवालात नमूद केले आहे.
केरळमध्ये समूह संसर्ग
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये काही भागात कोरोनाचा समूह संसर्ग (कम्युनिटी स्प्रेड) सुरू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दिली. तिरुवनंतपूरमच्या काही किनारी भागात कोरोना संक्रमण वेगाने होत आहे. या भागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. या भागात कोरोनाचा कम्यूनिटी संसर्ग सुरू झाला आहे. आज (शनिवार)पासून या भागात पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असेही विजयन यांनी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply