Breaking News

रायगडात दरडी कोसळून मृत्यूचे थैमान; महाडच्या तळीयेत माळीणची पुनरावृत्ती

38 जणांवर काळाचा घाला; मृतांची संख्या वाढण्याची भीती

महाड ः प्रतिनिधी

अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून 38 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगार्‍याखाली अनेक जण दबले गेले असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या तेथे युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. तळीये येथे गुरुवारी सायंकाळी 4च्या सुमारास दरड कोसळली, मात्र बचावकार्य शुक्रवारी सकाळी सुरू झाले. मातीच्या ढिगार्‍याखालून 38 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर आणखी 30 ते 40 जण या ठिकाणी अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येणार आहे.

पंतप्रधानांकडून शोक व्यक्त, मदत जाहीर

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाड तालुक्यातील तळीये दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे तसेच पंतप्रधान कार्यालयाकडून मृतांच्या वारसांना दोन लाखांची आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ‘महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत क्लेश वाटला. मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना. जखमी व्यक्ती लवकर बर्‍या व्हाव्यात ही सदिच्छा. महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या स्थितीवर लक्ष असून पावसाचा फटका बसलेल्याना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे,’ असे पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळल्याने जी दुर्घटना घडली ती अत्यंत दु:खद आहे. या संदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एनडीआरएफचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी संवाद साधला आहे. एनडीआरएफचे पथक मदत आणि बचावकार्य करीत आहे. केंद्र सरकार लोकांचे प्राण वाचवण्यासाठी शक्य ती मदत करीत आहे.

-अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांकडून पाहणी

महाड ः विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला शुक्रवारी (दि. 23) भेट देऊन पाहणी केली. माजी मंत्री गिरिष महाजन, आमदार निरंजन डावखरे सोबत होते. या वेळी दरेकर यांनी सांगितले की, अतिशय हृदय हेलावणारी ही घटना आहे. अनेक दिवसांपासून हवामान खात्याने रेड अलर्ट दिला असून आम्हीसुद्धा सांगितले होते कोकणात सुविधा बळकट करा, मात्र लोकांना अगोदरच स्थलांतरित करण्यात आले नाही. त्यामुळे हे जीव गेले. अगोदरच जर टीम आली असती तर आज हे निष्पाप जीव वाचले असते, परंतु एवढी बेपर्वाई प्रशासनाची लोकांचे जीव घेण्यापर्यंत कधीच पाहिली नाही. आधी पंचनामे करून मदत पुरवा आणि खाण्या-पिण्याची व्यवस्था करा, असे आवाहनही त्यांनी राज्य सरकारला केले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply