गव्हाण : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरूपौर्णिमेनिमित्त स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या वेळी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. एसएससी परिक्षा एप्रिल 2021मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यात एसएससी परीक्षा एप्रिल 2021 मध्ये प्रथम सानिका तानाजी चव्हाण (97.60 टक्के), द्वितीय प्रचिता रवींद्र भोईर (97.20 टक्के), तृतीय मितेश महेंद्र ठाकूर (87.20 टक्के) तसेच तुकडी निहाय (अ-सिद्धिका पाटील व भारती गोंदके या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
दरम्यान, शासकीय धोरणानुसार विद्यालयामध्ये व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ व माता पालक संघाची स्थापना करण्यात आली. कोविडच्या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक 2021-22 या वर्षात शाळा सुरू करण्याविषयी पालकांच्या संमतीसाठी ही सभा बोलविण्यात आली होती. पालकांनी शाळा सुरू करण्यास आवाजी मतदानाने संमती दर्शवली.
अध्यक्षीय भाषणात अरुणशेठ भगत यांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांनी घ्यावयाच्या विशेष खबरदारीची कल्पना देऊन शाळा सुरू करण्याविषयी सकारात्मक विचार मांडले. विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांनी प्रास्ताविक पर मनोगतात व्यास पौर्णिमेचे महत्त्व विशद करून शाळा सुरू करण्याविषयी सकारात्मक विचार व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर प्रमोद कोळी यांनीही शाळा सुरू करण्याविषयी पालकांनी सकारात्मकता दर्शवावी, असे आवाहन केले.
या वेळी स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंतशेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी, उपसरपंच अरुण कोळी, ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, ज्येष्ठ नेते जयवंत देशमुख, नामदेव ठाकूर, विद्यालयाचे उपप्राचार्य राजकुमार चौरे, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर रवींद्र भोईर, प्रा. तानाजी चव्हाण, जुनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख ज्योत्स्ना ठाकूर, व्यवस्थापन समिती सचिव द्रोपदी वर्तक शिक्षक पालक संघाचे सचिव देवेंद्र म्हात्रे, माता-पालक संघाच्या सचिव जे. एच. माळी, मोरू नारायण विद्यालय आणि टी. एन. घरत ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या गोळे मॅडम, जोशी सर तसेच पालक, विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यालयाचे उपशिक्षक सागर रंधवे यांनी सूत्रसंचालन केले तर उपप्राचार्य राजकुमार चौरे यांनी आभार प्रदर्शन केले.