शेतात भाताच्या रोपाऐवजी माती आणि दगड
कर्जत : बातमीदार
अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतांमध्ये पुराच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर दगड आणि माती वाहून आल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. कर्जत तालुक्यातील किमान तीन हजार हेक्टर जमिनीवरील भातपिके मातीत गाडली गेली आहेत.
कर्जत तालुक्यात सतत तीन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाने ओढे आणि नाले तसेच नद्या दुथडी भरून वाहत होत्या. नद्या आणि नाल्यांमधून पाणी बाहेर पडून आजूबाजूच्या शेतात घुसले जात होते. कर्जत-भिवपुरी रोड रेल्वे पट्ट्यातील डोंगराळ भागात अनेक दगडखाणी आहेत. तेथे मातीचे ढिगारे बाजूला काढून ठेवले जातात.
हे मातीचे ढिगारेच्या ढिगारे पावसाच्या पाण्याबरोबर डोंगर पायथ्याशी असलेल्या वांजळे, कोषाणे, आषाणे, उमरोली, सावरगाव आदी गावांच्या शेतांमध्ये आले आणि भात पिके उद्ध्वस्त झाली.
दरम्यान, उल्हास नदीला आलेल्या महापूराचे पाणी कर्जत तालुक्यातील नेवाळी, तळवडे, कोल्हारे, धामोते, मालेगाव, दहिवली, बिरदोले, शेलू या भागातील भातशेतीत घुसले. त्याबरोबरच या भागातील भाताच्या पिकावर दगडांचा आणि मातीचा खच पडला आहे. तर दुर्गम भागात असलेल्या ओलमण, नांदगाव, खांडस, पाषाणे, कळंब, वारे, पोशीर, दहिवली, माणगाव, उमरोली, किरवली, वाकस, वारे, कशेळे, बोरिवली, मानिवली, पाथरज, मोग्रज, शेलू या ग्रामपंचायत हद्दीमधील हजारो हेक्टर जमिनीमध्ये दुथडी भरून वाहणार्या ओढे नाल्यांचे पाणी घुसले होते. त्यात माती आणि दगड येऊन शेतात थांबले असून, त्यामुळे भातशेती दिसेनाशी झाली आहे.
हे नुकसान केवळ भाताच्या पिकाचे नाही तर आम्हाला आता भाताच्या शेतात येऊन थांबलेल्या दगड आणि माती यांना बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागणार आहे. या नुकसानीबद्दल शासन कोणताही विचार करीत नाही. आमच्या अनेकांच्या घरात महापूरचे पाणी घुसले आणि सर्व साहित्य भिजले आहे याची भरपाई न भरून येणारी आहे.
-भगवान जामघरे, शेतकरी, बिरदोले, ता. कर्जत
पुराच्या पाण्याबरोबर वाहून आलेल्या आलेल्या दगड आणि मातीमुळे आमची अनेक शेते नाहीशी झाली आहेत. शेताच्या बांधांची मोडतोड होऊन ते वाहून गेले आहेत. बांध बंदिस्तीसाठी शासन काही मदत करणार आहे काय?
-प्रकाश केवारी, शेतकरी, रा. ताडवाडी, ता. कर्जत
प्रत्येक वर्षी पावसाळ्यात थोडीथोडी माती येते परंतु गुरुवारी फारमोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात माती वाहून आली आणि आमची भात शेती जमीनदोस्त झाली.
-हरिचंद्र ठोंबरे, शेतकरी, कोषाणे
आम्ही नुकसानीचे पंचनामे करीत आहोत, मात्र शासनाचे नुकसान भरपाईचे निर्देश प्राप्त झाले नाहीत. पंचनामे केले असले तरी कोणत्या नुकसानीची भरपाई मिळणार हे आम्हाला सध्या शेतकर्यांना सांगता येत नाही.
-शीतल शेवाळे, तालुका कृषी अधिकारी, कर्जत