खोपोली : प्रतिनिधी
चालू आर्थिक वर्षासाठी खोपोली नगरपालिका प्रशासनाकडून मालमत्ता कर वाढीचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला नगरसेवक आणि नागरिकांनी विरोध दर्शविला होता. त्याची दखल घेत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी मालमत्ता कर वाढीचा निर्णय मागे घेण्याच्या सूचना मुख्याधिकारी गणेश शेटे यांना दिल्या.
खोपोली नगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कर वाढीचा निर्णय घेतला होता. यात ज्या मालमत्ता भाड्याने देण्यात आल्या आहेत, अशांच्या मालमत्ता करामध्ये सुमारे 35 टक्के वाढ करण्यात आली होती. प्रशासनाने परस्पर घेतलेल्या या करवाढीच्या निर्णयाला सर्वात अगोदर नगरसेवक किशोर पानसरे यांनी तीव्र विरोध केला. त्यानंतर सर्व स्तरातून विरोध करण्यात आला. या करवाढीबद्दल शहरातील जनतेमध्ये दिवसेंदिवस संताप वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व पक्षीय नगरसेवक व गटनेत्यांनीही या करवाढीला विरोध दर्शविला होता. त्याची दखल घेवून नगराध्यक्ष सुमन औसरमल, उपनगराध्यक्ष विनिता कांबळे यांनी मुख्याधिकारी गणेश शेटे यांना मालमत्ता कर वाढीचा निर्णय मागे घेण्याच्या सूचना केल्याची माहिती नगरसेवक मोहन औसरमल यांनी नगरसेवकांच्या उपस्थितीत दिली.
खोपोली नगरपालिका प्रशासनाचा मालमत्ता कर वाढीचा निर्णय लवकरच रद्द होईल व मागील वर्षानुसार याही वर्षी मालमत्ता कर आकारणी केली जाईल, असे नगरसेवक औसरमल यांनी स्पष्ट केले.