दासगाथेच्या अखेरिस 1372 व्या ओवीमध्ये समर्थांनी
तुम्ही आम्ही रामदास एकचि।
देव एकचि हा नाना वेषधारी। रे सखया।
लटिके म्हणसी तरी तुझा देव।
माझा होऊनी मज हृदयी धरी। रे सखया॥
असे म्हणून विठ्ठलभक्तीची अनुभूतीच प्रकट केली आहे.
समर्थांनी बाडांक 1497 मध्ये श्रीविठ्ठल प्रेमदर्शक एक सुंदर अप्रतिम अभंग रचला आहे.
वैकुंठीचा राणा उभा विटेवरी। पुंडलिकद्वारी पंढरीसी॥
अठ्ठावीस युगे पाऊले समान। तिष्ठे नारायण भक्तासाठी॥
कटावरी दोन्ही ठेवियले कर । रखमाई सुंदर वामभागी॥
कीर्तनाचे वेळी उभा पाठी राहे । सदा वाट पाहे संतभेटी॥
राखियेला धर्म दृष्ट निर्दाळोनी । तारितो निर्वाणी नाम घेता ॥
माध्यान्ही सुरवर भेटी येती त्याचे । स्नान भीवरेचे करीती नित्य ॥
ऐसे क्षेत्र अन्य भूमी नाही दुजे। भक्ताचिये काजे उतावेळ ॥
आनंदले मन पाहता लोचन। मूर्ति ध्यानी मने आठवीता ॥
दास म्हणे दावी भक्तांचा सोहळा। कृपेचा कोवळा म्हणोनिया ॥
समर्थांनी कोणकोणती तिर्थे पाहिली या सर्गात दासायनामध्ये अनंतदास रामदासी यांनी रामीरामदासांचा अभंग नमूद केला आहे. त्यामध्ये,
सकळ तिर्थांसी आधार। तो विचार सारासार॥
अयोध्या मथुरा माया। काशी कांती द्वारावती॥
तुळजापूर पंढरपूर।
नर्सीपूर कोल्हापूर॥
अशा दोन ओव्या आहेत.
शिवछत्रपतींना संत तुकाराम यांनी सहा अभंगांमधून जे उत्तर दिले; त्यापैकी पाचव्या अभंगात,
राया छत्रपती ऐकावे वचन। रामदासी मन लावी वेगी॥
रामदासस्वामी सोयरा सज्जन। त्यासी तनमन अर्पि बापा॥
मारूतीअवतार स्वामी प्रगटला। उपदेश केला तुजलागी॥
रामनाम मंत्र तारक केवळ। जालासे सीतळ उमाकांत॥
उफराटे नाम जपता वाल्मिक। जाला पुण्यश्लोक तात्काळची॥
तोच बीजमंत्र वसिष्ठ उपदेश। याहून विशेष काय आहे॥
आता धरू नको भलत्याचा संग। राम पांडुरंग कृपा करी॥
धरू नको आमुची आशा कृपाळा। रामदासी डोळा लावी आता॥
तुझी चाड आम्हा नाही छत्रपती। आम्ही पत्रपति त्रैलोक्याचे॥
चार दिशा आम्हा भिक्षेचा अधिकार। नेमिली भाकर भक्षावया॥
पांडुरंगी जाली आमुची हे भेटी। हातात नरोटी दिली देवे॥
आता पडो नको आमुचिये काजा। पवित्र तु राजा रामभक्त॥
विठ्ठलाचे दास केवळ भिकारी। आम्हा कधी हरी उपेक्षिना॥
शरण असावे रामदासालागी। नमन साष्टांगी घाली त्याशी॥
तुका म्हणे राया तुज असो कल्याण। सद्गुरू शरण राहे बापा॥
समर्थ रामदासस्वामींची थोरवी संत तुकारामांनी व्यक्त केली आहे.
समर्थ रामदासस्वामींना संत परंपरेत अद्वितीय स्थान आहेच पण पंढरपूरच्या आषाढी वारीमध्येही समर्थांचे स्थान या पंढरपूरगमनामुळे उच्च राहिले आहे.काशीपंडीत गागाभट्ट यांच्या प्रमुखत्वाखालील विद्वान परिषदेला पंढरपूरमध्येच सामोरे जाणार्या समर्थांनी,
’वेद तो मंद जाणावा। सिध्द आनंदवनभुवनी।
आतुळ महिमा तेथे।आनंदवनभुवनी॥
असे भाष्य केले होते. समर्थांनी एका मोळीविक्याकडून वेद वदवून घेतले आणि त्याला त्याच्या पूर्वजन्मातील शापातून मुक्त करीत गांधर्व जन्मात पोहोचविले. दुसरीकडे, पंढरपूरची आषाढीची वारी करून चातुर्मासासाठी कोंढवळ म्हणजेच हेळवाकच्या घळीमध्ये वास्तव्यादरम्यान,
गिरीचे मस्तकी गंगा।
तेथूनी चालली बळे।
धबाबा लोटती धारा।
धबाबा तोय आदळे॥
ही कविता लिहून समर्थांनी सृष्टीतील बारकावे यथार्थ शब्दांकित केले. मात्र, त्यांना सीतळाईचा त्रास झाल्याने रघुनाथभट गोसावी यांनी त्यांना चाफळ मठापर्यंत पोहोचविल्याचा प्रसंग यांचा संदर्भ घेता समर्थ आणि त्यांची पंढरपूर वारी याच प्रसंगांचा संबंध दृढ असल्याचे दिसून येते.
नाना तीर्थां क्षेत्रांसि जावे।
तेथे त्या देवाचे पूजन करावे ॥
नाना उपचारी अर्चावे। परमेश्वरासी॥
ही श्रीमत् दासबोधातील 17.4 ची ओवी आणि श्रीमत दासबोधाची पहिली ओवी
श्रोते पुसती कोण ग्रंथ।
काय बोलिले जी येथ ॥
श्रवण केलियाने प्राप्त।
काय आहे॥
झाल्यानंतर दुसर्याच ओवीत समर्थांनी उत्तर दिलेय
ग्रंथा नाम दासबोध । गुरूशिष्याचा संवाद ॥
येथ बोलिला विशद। भक्तीमार्ग॥
असे भक्तीमार्गाचे बहुविध प्रकार असले तरी समर्थांच्या विचारांचा अनुनय करणार्या प्रत्येक अनुग्रहीने पंढरपूरची वारी करण्याची आणि तीही आषाढी एकादशीची वेळ साधायची आवश्यकता आहे.
अलिकडेच, समर्थांच्या सर्वग्रंथ लेखन आरंभाचे ठिकाण असलेल्या कोंड नलवडा पारमाचीवाडी रामदासपठार येथे आनंदवनभुवन आणि सुंदरमठाचे संशोधन समर्थभक्तांना आणि समस्त रामदासी परिवाराला भेट दिल्यानंतर या संशोधनकार्यामध्ये ज्या असंख्य अस्पर्शी विषयांबद्दल निश्चिती झाली. त्यापैकी समर्थांचे पंढरपूरगमन म्हणजेच आषाढीवारी असल्याने आता विठ्ठलाच्या दारी पंढरपूरकडे समर्थांचे अभंग गात ’जय जय रघुवीर समर्थ’ अशी हाळी देत समर्थभक्तांची मांदियाळी वारीमध्ये सामील होण्याची आवश्यकता आहे.
या लेखनापूर्वी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासोबत चर्चा झाली आहे. हा अभ्यासपूर्ण लेख पूर्ण होऊन प्रसिध्द झाल्यानंतर आप्पासाहेबांनीदेखील समर्थांच्या पंढरपूर वारीला दुजोरा देणारे लेखन ’साप्ताहिक लोकप्रभा’ मधून केले आहे. त्यामुळे समर्थभक्तांनीदेखील आता पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला जाताना ’जय जय रघुवीर समर्थ’चा घोष करीत निघाले पाहिजे.
समाप्त
-शैलेश पालकर, खबरबात