Breaking News

बालकांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका

बालकाची जडणघडण ही आई-बाबा, परिसर, समाज, शाळा व त्याला मिळणार्‍या सभोवतालच्या शिक्षणावरच अवलंबून असते. सहज पाहता असे लक्षात येते की, अतिलाडामुळे श्रीमंत घरातील मुले ऐदी होतात. तर सामान्य कुटुंबातील प्रतिकूल वातावरणातील मुले मेहनतीने स्वबळावर उभे राहताना दिसतात. म्हणजे पालकांच्या शिक्षणाबरोबर आर्थिक व सामाजिक परिस्थितीचा परिणाम मुलांच्या जडणघडणीवर होत असतो.

लहान मुले आई-बाबा कसे वागतात? कसे बोलतात? काय खातात ? काय पितात? इत्यादीचे अनेक अंगाने सूक्ष्म निरीक्षण करीत असतात, तसेच ते त्याची तुलना बाहेर आपल्या मित्रांसोबत करत असतात. लहान बालके घरामध्ये सुरू असलेल्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असतात, पण घरच्या मोठ्या मंडळींना वाटते की, हे तर छोटेसे बाळ आहे, याच्या काय लक्षात येणार! पण चूक इथेच होते. मुलांना लहान समजण्याची खूप मोठी चूक मोठी माणसे करतात. त्याचा मुलांच्या भावविश्वावर खोलवर परिणाम होत असतो. घरामध्ये जर आई-वडील, आई-आजी यांची सतत भांडणे होत असतील, तर मुले उदास होतात. त्यांना विविध प्रश्न पडतात. कोण बरोबर, कोण चूक याची तुलना करतात. त्यामुळे कटाक्षाने लहान मुलांसमोर घरातील मोठ्या माणसांनी रागावणे, वादविवाद, भांडण करणे टाळले पाहिजे. याचा परिणाम बालमनावर खोलवर होत असतो. लहान मुलांसमोर बोलताना चांगले विचार मांडले पाहिजे, एकमेकांना समजून घेतले पाहिजे, एकमेकांच्या समस्या सोडविल्या पाहिजेत. शक्यतो बरेच पालक मुलांना खरे बोलण्यास सांगतात व स्वतः मात्र त्यांच्या समोरच खोटे बोलतात. मुलांना हे कळत नाही की, मला नेहमी खरे बोलावे म्हणून सांगणारे माझे आई-बाबा दुसर्‍यांना खोटे का बोलतात?

बर्‍याच पालकांना विडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा, ड्रिंक यांचे व्यसन असते. प्रथम पालकांनी या व्यसनांना तिलांजली दिली पाहिजे. हे व्यसन सोडणे शक्य नसले, तरी कमीतकमी आपल्या लहान मुलांच्या समोर ते आपण कटाक्षाने टाळले पाहिजे. मुलांसमोर आपण आदर्श असावे. जेणे करून ते भविष्यात उत्तम नागरिक बनतील.

खेड्यातील काही पालक मुलांनाच सिगारेट, तंबाखू, गुटखा आणायला सांगतात. मुलांना वाटते, आपले बाबा हे खातात म्हणजे नक्की यात काहीतरी विशेष आहे. या उत्सुकतेपोटी मुले व्यसनाला बळी पडतात. आई, वडील मोबाइलमध्ये गुंतलेले असतात आणि मुलांना मोबाइल पाहू नका, असे सांगतात. तर हे शक्य नाही. तुम्ही मुलांना जे सांगता ते स्वतः आचरणात आणले तरच मुलांवर त्या गोष्टीचा प्रभाव पडतो अन्यथा पालथ्या घड्यावर पाणी अशी अवस्था होऊन जाते.

बालकाचा विकास हा आईच्या जीवनाशी जास्त निगडित आहे. असे असले तरी इतिहासात व समाजात आपण पाहिले की, ज्या बालकांची आई त्यांच्या बाल्यावस्थेतच हरवली आहे, अशा बालकांनीही विशेष नाव कमावलेले आहे. कारण त्यांचे लाड होत नाहीत. आईशिवाय जगणारी मुले संघर्षातून उभी राहतात.

नवविवाहित जोडप्यांनी स्वतः उत्तम पालक बनण्याचे ठरवल्यास नव जन्म झालेले बालक जाणीवपूर्वक घडते. वयाच्या तीन महिन्यापासूनच बालक तुम्ही त्याला जे सांगाल किंवा शिकवाल ते भराभर स्वीकारत असते. त्यामुळे चांगले ते सांगा. वाईट किंवा चुकीच्या गोष्टी सांगणे कटाक्षाने टाळा. मूल विज्ञानवादी होईल. यासाठी त्याला वैज्ञानिक गोष्टी सांगा. भीती नावाची भावना त्याच्यामध्ये येऊ देऊ नका. मग बघा बालकाची जडणघडण कशी व्यवस्थित होते ते!

बालकाची शिक्षण ग्रहणाची क्रिया ही आईकडूनच होत असते. गर्भावस्थेसह पहिली दोन वर्षे बालक नैसर्गिकरीत्या आईच्या परंपरागत जीवनातून मूलभूत शिक्षण घेत असते. त्याच्या मनात विविध विचार, चिकित्सा, जिज्ञासा, अवलोकन, ग्रहण, दुर्लक्षितपणा अशा बाबी सुरूच असतात. बालक चालू लागताच, बोलू लागताच काही तरी त्याच्या दृष्टीने नवीन अद्भूत साहसीक्रिया करण्याचा प्रयत्न करत असते. नेमके याच वेळी पालक अति काळजीमुळे मुलांना साहसीक्रियेपासून रोखतात. त्यांच्या मनात भीती निर्माण करतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना धाडसी, साहसी, वीर बलवान, विद्वान, ज्ञानी बनवायचे की मठ्ठ हा पालकांनी निर्णय घ्यायचा आहे. आपण मुलांना जिजामाता, छत्रपती शिवाजी महाराज, तथागत गौतम बुद्ध, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी, अहिल्याबाई होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, तसेच अनेक थोर, वीरांच्या, शास्त्रज्ञांच्या, संतांच्या कथा, विविध कार्यक्रम आणि प्रबोधनातून सांगत असतो. त्याचा बालकाच्या जडणघडणीवर उत्तम प्रभाव दिसून येतो.

आपल्या आजी-आजोबांच्या काळात म्हणजे जवळपास 40 ते 50 वर्षापूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती होती. त्यामुळे घरामध्ये आजी-आजोबा, काका-काकू अनेक भावंडे एकत्र राहत असत. त्यामुळे एकत्र खेळणे, एकत्र फिरणे, एकत्र अभ्यास करणे, एकत्र काम करणे, एकत्र झोपणे, एकोप्याने राहणे असे करत करत आपण लहानाचे मोठे झालो. मुलांच्या बर्‍याच प्रश्नांची त्यावेळी उत्तरे मिळाली. शेतीशी निगडीत सर्व गोष्टी त्यांना माहीत होत. मग शेतात फिरणे, पोहणे, चिखलात खेळणे अशा गोष्टी त्या काळी सहज होत असत. आजकाल कुटुंब विभक्त झाली. मुलांना फक्त आई, वडील या दोघांचा सहवास लाभतो. त्यातही दोघे नोकरी करत असतील तर, आणखीनच वाईट अवस्था निर्माण होते. मुलांना जिज्ञासेपोटी पडणार्‍या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. त्यामुळे बालक एकलकोंडे बनते. शरीराची वाढ होते पण, मानसिकदृष्ट्या ते दबलेले असते.

कदाचित हम दो हमारा एक या कल्पनेमुळे एकुलत्या एक अपत्यामुळे पालक बालकाला जास्त जपत असावेत. पण बालकाच्या उत्कृष्ट जडणघडणीसाठी त्याला मुक्तपणे खेळू दिले पाहिजे. ताटातील सर्व पदार्थ आनंदाने खाण्याची सवय मुलांना लावा. मुलांसोबत जेवण्याची सवय लावा. एखादा पदार्थ खायला केल्यास किंवा चॉकलेट, मिठाई, खेळणी आणल्यास त्याच्या शेजारचे मित्र येतातच. अशा वेळी बालकाच्या मित्रांसोबत ही गोष्ट वाटून घ्यायला मुलांना सांगा. निसर्गाच्या सान्निध्यात मुलांना फिरण्यास न्या. मुलांच्या चिकित्सक प्रश्नांची उत्तरे माहीत नसल्यास विचारून व माहिती घेऊन नंतर सांगेन असे उत्तर द्या. परंतु वेळ मारून नेण्यासाठी काहीही सांगू नका. बालकांना योग्य वयात तुमच्या जीवनातील सर्व व्यवहार कळू द्या.

बालकांना जगातील भव्य-दिव्य असेल त्याची माहिती द्या. ऐपत असल्यास घरात संगणक, लॅपटॉप, विविध विषयांची पुस्तके, स्पर्धा परीक्षा मासिके अवश्य आणा. बालकाच्या मनावर राष्ट्रवाद, निधर्मीवाद, समतावाद, मानवतावाद बिंबवण्याकडे लक्ष द्या.

तुकाराम महाराज म्हणतात…

ओले मूळ भेदी। खडकाचे अंग॥

बालकांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. वयाच्या दुसर्‍या, तिसर्‍या वर्षी मुलांना मनसोक्त खेळू द्या, बागडू द्या. यातूनच त्यांच्या मनामध्ये सर्जनशीलता, कल्पकता निर्माण होईल. ही ऊर्जा अशा पद्धतीने न वापरल्यास साचलेली हीच ऊर्जा मोठेपणी विनाशकारी होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून मुलांच्या पंखांना भरारी घेता येईल, असे सर्वच दिशांना विस्तारणारे वातावरण घरात, समाजात, गावात तयार करा.

बर्‍याच वेळा पालक आपल्या मुलांवर स्वतःच्या स्वप्नांची पूर्तता करावी, यासाठी आग्रही असतात. पण बालकाच्या आवडी निवडी, छंद याचा विचार करून त्याला त्याच्या कलाप्रमाणे एखादे क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. नाहीतर जबरदस्तीने एखाद्या क्षेत्रात मुलगा गेला तर तो तेथे प्रगती करू शकत नाही. मग अपयश त्याच्या वाट्याला येते. त्यामुळे मुलांमध्ये डिप्रेशनचे प्रमाण वाढते. यामुळे मुलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पालकांनी धडपडले पाहिजे.

-जगदिश जाधव, मुख्याध्यापक, जगापूर, यवतमाळ

Check Also

आपटा ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर

रसायनी : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील व उरण विधानसभा मतदारसंघातील आपटा ग्रामपंचायतीच्या उद्धव ठाकरे गटाच्या सरपंच …

Leave a Reply