Breaking News

रोहा एसटी बसस्थानकाला गळती

राज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष; प्रवासी त्रस्त

रोहे :प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाच्या रोहा येथील बस स्थानकाची दूरवस्था झाली आहे. बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील छप्पर उडाले आहे. स्थानकाला गळती लागल्याने प्रवासी ओलचिंब होत आहेत. चक्रीवादळात उडालेले छप्पर अद्याप न बसवल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

तालुक्याचे मुख्यालय असल्याने रोह्यात दररोज शासकीय कामासाठी व खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. नेहमीच वर्दळीचे ठिकाण असलेले हे बस स्थानक पावसाळ्यात गळत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवासी व नागरिकांना ये-जा करावी लागते. मात्र या प्रवेशद्वारावरील छप्पर उडाल्याने पावसाचे पाणी थेट बस स्थानकात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना भिजावे लागत आहे.

रोहा बस स्थानकाची दुरुस्ती करावी, या बाबत  काही सामाजिक संघटनांनी राज्य परिवहन महामंडळाला निवेदन दिले होते. परंतु अद्याप ही समस्या सुटल्या नसल्याने परिवहन महामंडळ लक्ष घालणार का, असा सवाल प्रवासी वर्गातून होत आहे.

लॉकडाऊनमुळे गेल्या काही महिन्यांपासून रोहा बस स्थानकातून प्रवासी वाहतूक बंद होती. मात्र आता  कोरोना आटोक्यात येत असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागासह मुंबई, पुणे, ठाण्यात रोहा बस स्थानकातून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या बस स्थानकातून नियमीत प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळ रोहा बस स्थानकातील समस्या दूर कराव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply