खालापुरातील डोंगर भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे
खोपोली : प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे तळीये गावात घडलेल्या दरड दुर्घटनेत अनेक संसार गाडले गेले असून, अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे, मात्र धनिकांच्या वीकेण्डसाठी डोंगर, दर्यांत होत असलेली बांधकामे किती सुरक्षित आहे याचादेखील आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
खालापूर तालुक्याला सह्याद्रीचे कवच आहे. एका बाजूला इरसालगड, दुसरीकडे माणिकगड आणि मावळात जाताना राजमाची अशी सह्याद्रीची अभेद्य तटबंदी आहे, मात्र गेल्या अनेक वर्षापासून सह्याद्री पोखरला जात असून, दगडखाण व्यवसाय आणि त्या जोडीला धनिकांसाठी बंगलो प्रकल्प यामुळे डोंगरांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. खालापूर तालुक्यात जादुई नगरीच्या नावाखाली डोंगरामध्ये बांधकामे, गृहनिर्माण प्रकल्पांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मुंबई आणि पुणे या दोन महानगराचा मध्यबिंदू असल्याने गुंतवणूकदार खालापूर तालुक्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. त्याचाच फायदा घेत तालुक्याच्या डोंगर भागातील बंगलोंची कोट्यावधी रुपये किमतीमध्ये विक्री होत आहे. ही बांधकामे करताना मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे नुकसान झाले आहे. अनेक दुर्मिळ वृक्षांची तोड तसेच दगड, मातीचे उत्खनन करण्यात आले आहे. पावसाळी पाण्याचा नैसर्गिक मार्गदेखील अनेक ठिकाणी बंद किंवा बदलण्यात आल्यामुळे डोंगर माथ्यावर पडणारा पाऊस वाहत नदीकडे जाणं बंद झाल्याचा परिणाम भविष्यात भोगावा लागणार आहे.
अनेक ठिकाणी तर वनविभागाच्या जागेवर अतिक्रमणे करीत अशा प्रकल्पापर्यंत रस्ते नेण्यात आले आहेत. या प्रकल्पाला काही ठिकाणी विरोध झाला, मात्र कामाच्या ठिकाणी ठेका मिळाल्यानंतर हा विरोध मावळत गेला.
प्रशासन एकीकडे जिल्ह्यातील धोकादायक दरडग्रस्त गावांची यादी तयार करत असताना अशाप्रकारे डोंगरात उभे राहात असलेल्या प्रकल्पाबाबत डोळेझाक करत आहे. खालापूर तालुक्याचे पर्जन्यमान अधिक आहे. दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे भविष्यातील संकट ओळखून तळिये दुर्घटना टाळण्यासाठी सह्याद्रीची झीज थांबविण्यासाठी प्रयत्न व्हावे, अशी पर्यावरण प्रेमाची मागणी आहे.