Breaking News

विविध संस्थांचा महाडमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात

अलिबाग : प्रतिनिधी

साहित्यसंपदा, शिवधारा ट्रेकर्स, तेजस्विनी सांस्कृतिक आणि सामाजिक फाऊंडेशन (अलिबाग) आणि नादब्रह्म एक स्वराविष्कार (गिरगांव) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आम्ही समाजाचे देणे लागतो’ हा उपक्रम नुकताच यशस्वीरीत्या पार पडला. त्यात महाड, पोलादपूर येथील पूरग्रस्तांना व रस्ता खचल्यामुळे संपर्क तुटलेल्या गावांसाठी या संस्थांमार्फत मदत देण्यात आली, अशी माहिती साहित्यसंपदा प्रमुख वैभव धनावडे यांनी दिली.

आम्ही समाजाचे देणे लागतो या उपक्रमांतर्गत या संस्थांच्या वतीने नुकतेच नागोठणे येथील रिलायन्स कंपनीचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे, साहित्यसंपदा संस्थेचे संस्थापक वैभव धनावडे, पेणचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पोलादपूर तहसीलदार समीर देसाई, रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, मंडळ अधिकारी लक्ष्मिकांत सिनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गरजूंना अन्नधान्य, चादर, कपडे, ब्लँकेट, पाणी, सॅनेटरी पॅड्स आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.

रमेश धनावडे, वैभव धनावडे, जिविता पाटील, तसेच लालसिंग वैराट, सुनील मत्रे, पूनम धनावडे, मेहुल पटेल, ओंकार पवार, ओंकार वर्तक, यश पाटील, सिद्धी गुंड या सर्वांनी या दुर्गम भागात प्रत्यक्ष उपस्थित राहून मदत पोहचवली, तसेच पोलादपूर तालुक्यातील संपर्क तुटलेल्या 53 गावांना प्रत्यक्ष मदत पोहचविली. 500 हून अधिक कुटुंबाना प्रत्यक्षरीत्या ही मदत पोहचविण्यात आली. या वेळी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ. शीतल मालुसरे उपस्थित होत्या.

महाड, पोलादपूर शहरातील तसेच, रानबिजरे आदिवासीवाडी, भराववाडी, राखीचा टोक, सुतारपेढा, कोसमवाडी कुंबलवणी, चिरेखिंड, सुतार पेढा, वाडा कुंबरोशी आणि इतर गावांनाही मदत पोहचविण्यात आली. या उपक्रमासाठी शिवधारा ट्रेकर्स संस्थेने आर्थिक स्वरूपात मदत गोळा करण्यास हातभार लावला.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply