लंडन ः वृत्तसंस्था
भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीत पाऊस पुन्हा एकदा यजमानांच्या मदतीला धावून आला. पहिल्या दिवशी इंग्लंडचा खेळ 183 धावांवर गडगडल्यानंतर दुसर्या दिवसाला लोकेश राहुल फॉर्मात असताना पावसाने खोडा घातला अन् खेळ थांबवावा लागला. तिसर्या दिवशीही टीम इंडियाने 95 धावांची आघाडी घेत इंग्लंडवर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु पुन्हा एकदा पावसाची एण्ट्री झाली अन् खेळ थांबवावा लागला.
रोहित शर्मा व लोकेश यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली, पण जेम्स अँडरसनच्या एका षटकाने टीम इंडियाच्या गोटात भीतीचा गोळा टाकला. विराट (0), पुजारा (4) आणि रहाणे (5) झटपट माघारी परतले. लोकेशने पाचव्या विकेटसाठी रिषभ पंतसह 33 धावा जोडल्या, मात्र ऑली रॉबिन्सनने रिषभला (25) बाद केले. शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या लोकेशला बाद करून अँडरसनने टीम इंडियाला मोठा धक्का दिला. लोकेशने 214 चेंडूंत 12 चौकारांसह 84 धावा केल्या. त्यानंतर रवींद्र जडेजाने फटकेबाजी केली. त्याने 86 चेंडूंत आठ चौकार व एक षटकारासह 56 धावा केल्या.
जडेजा-मोहम्मद शमी जोडीने 27 आणि शमी-जसप्रीत बुमराह जोडीने 13 धावांची भागीदारी केली. बुमराहने फटकेबाजी करताना तीन चौकार व एक षटकारासह 28 धावा केल्या. भारताने पहिल्या डावात 278 धावा करीत 95 धावांची आघाडी घेतली. इंग्लंडकडून ऑली रॉबिन्सनने (5/85) पाच आणि जेम्स अँडरसनने (4/54) चार विकेट्स घेतल्या. इंग्लंडनं दुसर्या डावात बिनबाद 25 धावा केल्या. ते 70 धावांनी पिछाडीवर असताना पाऊस सुरू झाला होता.