Breaking News

ऑस्ट्रेलियाला बांगलादेशने नमवले

आंतरराष्ट्रीय ट्वेण्टी-20 मालिका जिंकली

ढाका ः वृत्तसंस्था

पाच सामन्यांच्या मालिकेत पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने तिसर्‍या सामन्यात संघात बदल करताना बांगलादेशला 9 बाद 127 धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले, पण बांगलादेशच्या गोलंदाजांनी ‘कांगारूं’ना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. ऑस्ट्रेलियाला 128 धावांचे लक्ष्यही पार करता आले नाही.

बांगलादेशच्या सलामीवीरांना अपयश आल्यानंतर शाकिब अल हसन आणि महमुदुल्लाह यांनी संघाचा डाव सारवला. शाकिब 26 धावांवर बाद झाला. महमुदुल्लाहने 52 धावांची खेळी केली. अफिप होसैनने 19, तर नुरूल सहनने 11 धावा केल्या. जोश हेझलवूड व अ‍ॅडम झम्पा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. एलिसने 20व्या षटकाच्या अखेरच्या तीन चेंडूंवर महमुदुल्लाह, मुस्ताफिजूर रहमान व महेदी हसन यांना बाद केले अन् विक्रम नोंदवला. ऑस्ट्रेलियाकडून ट्वेण्टी-20 हॅट्ट्रिक घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी ब्रेट ली (वि. बांगलादेश, 2007) आणि अ‍ॅश्टन अ‍ॅगर (वि. द. आफ्रिका, 2020) यांनी अशी कामगिरी केली आहे.

लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून बेन मॅकडेमोट ( 35), मिचेल मार्श ( 51) व अ‍ॅलेक्स करी (20*) वगळता अन्य फलंदाजांनी नांग्या टाकल्या. बांगलादेशने त्यांना 20 षटकांत 4 बाद 117 धावांवर रोखून 10 धावांनी सामना जिंकला. या विजयासह बांगलादेशने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. बांगालदेशने ऑस्ट्रेलियावर मिळवलेला हा पहिला मालिका विजय आहे.

बांगलादेशने पहिल्या सामन्यात 131 धावांचा यशस्वी बचाव केला होता, तर दुसर्‍या सामन्यात 122 धावांचे लक्ष्य सहज पार केले होते. ऑस्ट्रेलियाचा हा सलग पाचवा ट्वेण्टी-20 मालिका पराभव आहे. या मालिकेआधी वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, भारत आणि इंग्लंड यांनी ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते, तर बांगलादेशचा हा ट्वेण्टी-20 सामन्यातील सलग सातवा विजय आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply