मान्सूनचा हा प्रवास अत्यंत देखणा, नयनमनोहर असून या प्रवासाची गाथा अॅलेक्झांडर फ्रेटर नामक लेखकाने ‘चेझिंग द मान्सून’ नावाच्या पुस्तकातून अत्यंत सुंदर रीतीने शब्दबद्ध केली आहे. अर्थात आजच्या घडीला आपल्याला त्याच्या या प्रवासाचा मजा घेण्यापेक्षाही अवघ्या राज्याची तहान भागवण्यासाठी त्याने लवकरात लवकर आगमन करावे याची चिंता अधिक भेडसावते आहे.
मान्सून अंदमानात दाखल झाल्याची आनंदवार्ता शनिवारी आली आणि दुष्काळाने होरपळून निघालेल्या, तहानेने व्याकुळलेल्या अवघ्या महाराष्ट्राला निश्चितपणे क्षणभरासाठी का होईना दिलासा वाटला. आज राज्यातील 26 धरणांतील पाणीसाठ्याने शून्याची पातळी गाठली असल्याने सगळ्यांचेच डोळे मान्सूनच्या वाटचालीकडे लागलेले आहेत. पोषक स्थितीमुळे मान्सून 18 मे रोजी अंदमानात दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला होता. तो खरा ठरला. दरवर्षी साधारणपणे 20 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल होत असतो. यंदा त्याचे दोन दिवस आधीच तिथे अवतीर्ण होणे हरखून टाकणारे असले तरी त्याचे केरळमधील आगमन मात्र विलंबानेच होणार असल्याचे सांगितले जाते आहे. निकोबार बेटांवर गेल्या 24 तासांत मोसमी पावसाने हजेरी लावली असून त्याच्या पुढील वाटचालीसाठी देखील वातावरण पोषक आहे. येत्या तीन दिवसांत मान्सून बंगालच्या उपसागराचा दक्षिणेकडील भाग, उत्तर अंदमानचा समुद्र तसेच अंदमान-निकोबारच्या सर्व बेटांना व्यापून टाकेल. मात्र अरबी समुद्रातील हवामान मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल होण्यास आणखी दहा दिवसांचा अवधी लागणार असल्याने केरळमधील त्याचे आगमन लांबण्याची शक्यता आहे. मान्सून सर्वसाधारणपणे 1 जूनला केरळमध्ये दाखल होत असतो. या आगमनानंतरच देशात मान्सून सक्रिय झाल्याचे म्हटले जाते. त्यानंतर 5 जूनपर्यंत तळकोकणात अवतरणारा मान्सून संपूर्ण राज्यभरात पोहोचायला 10-12 जून उजाडतो. 15 जुलैपर्यंत मान्सून अवघा देश व्यापून टाकतो. राज्याच्या जलसंधारण विभागाने आपल्या संकेतस्थळावर दिलेल्या माहिती नुसार औरंगाबाद विभागातील पाणीसाठा अवघा 0.43 टक्के इतका आहे. मागील वर्षी याच काळात तो 23.44 टक्के इतका होता. यंदाच्या दुष्काळाची तीव्रता या आकडेवारीवरून ध्यानात यावी. नाशिकच्या तिसगाव धरणात आणि नागपूरच्या तोतलाडोह धरणातही अनुक्रमे 0.01 आणि 0.08 टक्के इतकेच पाणी आहे. जलसंधारण विभागाकडील माहितीनुसार राज्यातील 103 मोठ्या, मध्यम आणि लहान जलाशयांमधील पाणीसाठा अवघा 11.84 टक्के इतका आहे. मागील वर्षी तो 23.73 टक्के इतका होता. राज्य सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच 151 तालुके व 260 मंडळांना दुष्काळग्रस्त जाहीर केले होते. लोकसभा निवडणुकांसाठीची राज्यातील मतदान प्रक्रिया पार पडताच विशेष परवानगी घेऊन सरकारने दुष्काळग्रस्त भागांतील परिस्थितीचा नव्याने आढावा घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. पाणीटंचाईने ग्रस्त भागांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असून राज्यात जनावरांसाठी चारा छावण्या देखील मोठ्या प्रमाणात उघडण्यात आल्या आहेत. राज्यातील जलाशयांतील पाणीसाठा गेल्या दहा वर्षांत कधीही गेला नाही इतका खाली गेल्याने मान्सूनच्या आगमनाकडे सगळ्यांचेच डोळे लागले आहेत.