Breaking News

अतिवृष्टीमुळे रायगडात चार हजार हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान

अलिबाग ः प्रतिनिधी

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील एक हजार गावांमधील चार हजार 64 हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून त्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात 21 व 22 जुलै रोजी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचा जास्त फटका महाड, पोलादपूर आणि कर्जत या तीन तालुक्यांमधील शेतकर्‍यांना बसला. जिल्ह्यातील इतर भागांतदेखील शेतीचे नुकसान झाले आहे.  जिल्ह्यातील एक हजार गावांमधील  एकूण  4 हजार 64 हेक्टर क्षेत्रावरील भातापिकाचे नुकसान झाले आहे. त्यापैकी चार हजार 55 हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असून 15 हजार 900 शेतकरी बाधित झाले आहेत. रायगड जिल्ह्यात यंदा एक लाख चार हजार 31 हेक्टरवर भात लागवडीचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले होते. जून महिन्यापासून चांगला पाऊस पडला. त्यामुळे शेतीची कामे लवकर सुरू होऊन लवकर आटोपली होती. रोपांची वाढदेखील चागंली झाली होती. आता चांगले उत्पादन होईल असे वाटत होते, मात्र जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टमुळे भातशेतीचे नुकसान झाले. पुरामुळे खाचरांमध्ये चिखल जमा झाला आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे शेतांचे बांध फुटले. शेतातील सुपिक माती खरडून गेली. शेतात दगडगोट वाहून आले आहेत. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे त्यांना शासनाकडून मदत दिली जाणार आहे. अतिवृष्टीमुळे  खरीप हंगामात भातशेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात कडधान्य व भाजीपाला लागवडीसाठी शेतकर्‍यांना बियाणे देण्यात येणार आहेत तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजागर हमी योजनेतून बांध बांधण्याची  कामे केली जातील, अशी महिती रायगडच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बानखेले यांनी दिली. 

शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. ज्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे त्यांना पंतप्रधान पीक विमा योजना, राष्ट्रीय आप्ती निधी यातून तसेच राज्य शासनाच्या इतर योजनांमधून मदत दिली जाईल.

-उज्ज्वला बानखेले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply