पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांची माहिती
पनवेल : वार्ताहर
सध्या सर्वत्र कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशावेळी नागरिकांच्या सोयीसाठी शासनाकडून जीवनावश्यक वस्तू व औषधे यांची उपलब्धता करून देण्यात येत आहे. यासाठी या वस्तूंची वाहतूक करणार्या वाहनचालक व कर्मचारी त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत असणार्या व्यक्तींना प्रत्येक पोलीस ठाण्यातून ओळखपत्रे देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती परिमंडळ-2 चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे
यांनी दिली आहे.
नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत येत्या 14 एप्रिलपर्यंत घराबाहेर पडू नये, जीवनावश्यक वस्तू किंवा औषधे लागल्यास घरातील एका व्यक्तीनेच घराबाहेर पडावे व आवश्यक असतील तेवढ्याच वस्तूंची खरेदी करावी, दुकानात, मेडिकल स्टोअरमध्ये गर्दी करू नये. दुकानदारांनी सुद्धा येणार्या ग्राहकांसदर्भात काळजी घ्यावी, लोकांनी मास्कचा वापर घराबाहेर पडताना करावा, प्रत्येक व्यक्तींमध्ये अंतर ठेवून व्यवहार करावा, लोकांसाठी भाजीपाला, दूध आदी महत्वाच्या गोष्टींची व्यवस्था शासनाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे त्या मालांची ये-जा होणार आहे. तरी लोकांनी उगाचच खरेदीसाठी बाहेर पडू नये, कमीत कमी लोकांशी संपर्क येईल अशा तर्हेचा वावर करावा.
एखाद्या सोसायटीमध्ये अशा प्रकारे संशयित इसम असल्यास किंवा परदेशातून व्यक्ती नूकतीच आली असल्यास त्यांना वेगळ्या खोलीत 14 दिवस ठेवावेत, त्याच्या कुटूंबियांनी योग्य ती काळजी व खबरदारी घ्यावी, सदर व्यक्तीला घराबाहेर पडून देऊ नये अशा प्रकारची व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या संदर्भात तिथे राहणार्या सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांनीसुद्धा या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, कोणीही अफवा पसरवू नये किंवा संबंधित व्यक्तींना वाळीत टाकण्याचा प्रयत्न करू नये त्यांंच्या विरूद्धही गुन्हा दाखल करण्यात येईल, सोसायटीच्या मुख्य गेटवर सॅनिटायझर व साबणाची व्यवस्था करण्यात यावी व प्रत्येकाने घरातच राहून आपली काळजी घ्यावी, कोणाला काही अडीअडचण किंवा अत्यावश्यक सेवा हवी असल्यास त्यांनी नजिकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. पोलीस 24 तास नागरिकांच्या मदतीसाठी उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर अनेक नाका कामगार किंवा भिकारी यांना सध्या कामसुद्धा मिळत नाहीये व खाण्यापिण्याचीही सोय होत नाही आहे, अशा व्यक्तींसाठी ज्या संस्था किंवा संघटना खाण्यापिण्याची व्यवस्था करू शकतात त्यांनी नजिकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलिसांच्या मदतीने खाण्याचे वाटप करावे असे आवाहन सुद्धा परिमंडळ-2 चे पोलीस
उपायुक्त अशोक दुधे यांनी नागरिकांना केले आहे.