Breaking News

भूमिपुत्रांच्या मागणीचा सरकार सकारात्मक विचार करेल; केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे कृती समितीला आश्वासन

नवी दिल्ली ः रामप्रहर वृत्तसेवा

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. 13) राजधानी दिल्लीत केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील सोबत होते. या वेळी मंत्री सिंधिया यांनी केंद्र सरकार सदैव भूमिपुत्रांच्या सोबत असल्याचे सांगून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अद्याप पूर्ण झाले नसताना सिडको नामकरणाची घाई का करीत आहे, असा सवाल उपस्थित केला. त्याचबरोबर भूमिपुत्रांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी शिष्टमंडळाला दिले. या भेटीत लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय राज्यमंत्रिपदी नियुक्ती झाल्याबद्दल कपिल पाटील यांचे अभिनंदन करून पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी आभार व्यक्त केले. या वेळी विमानतळाच्या नामकरणाबाबत चर्चा करण्यात आली तसेच याचसंदर्भात मंत्री पाटील यांच्यासमवेत केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची त्यांच्या दालनात भेट घेण्यात आली. मंत्री सिंधिया यांनी शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारून अध्यक्ष दशरथ पाटील व समितीचे म्हणणे ऐकून घेतले आणि भूमिपुत्रांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. कृती समितीच्या शिष्टमंडळात अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, उपमहापौर जगदिश गायकवाड, जे. डी. तांडेल, संतोष केणे, गुलाब वझे, राजेश गायकर, दीपक पाटील, संतोष घरत, विनोद म्हात्रे, नंदेश ठाकूर, गोपीनाथ म्हात्रे आदींचा समावेश होता.

मराठीत साधला संवाद

विशेष म्हणजे या वेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शिष्टमंडळाशी संपूर्ण वेळ मराठी भाषेत संभाषण केले. अत्यंत आपुलकीच्या नात्याने त्यांनी या चर्चेत संवाद साधत शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद देऊन आश्वस्त केले.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply