नवी मुंबई : प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून खारघर रेल्वेस्टेशन ते टाटा मेमोरियल कर्करोग रुग्णालयदरम्यान एनएमएमटी बससेवा अखेर सुरू करण्यात आली. टाटा रुग्णालयाच्या वतीने अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती. या वेळी रुग्णालय प्रशासनाने खारघर टाटा रुग्णालय ते परेल टाटा रुग्णालयदरम्यान बस सुरू करण्याची मागणीही केली आहे. याबाबत लवकरच सर्वेक्षण करून बस सुरू करण्यात येईल, असे आश्वासन एनएमएमटी प्रशासनाने दिले आहे. खारघरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून टाटा मेमोरियल कर्करोग रुग्णालय सुरू आहे. आता या रुग्णालयाचा विस्तारही होणार आहे. या ठिकाणी देशातील सर्वच भागांतून कर्करोग रुग्ण येत असतात. त्यात ईशान्य भारत व उत्तर भारतातून येणार्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते. रिक्षा, टॅक्सी करून या रुग्णालयात जाणे त्यांना परवडत नाही. लोकलने हे रुग्ण खारघर स्टेशनपर्यंत येतात तेव्हा रिक्षा किमान 70 ते 80 रुपये, तर 150 पर्यंत भाडे टॅक्सी आकारते. त्यात मीटरने भाडे न आकारता जादा भाडे आकारले जाते. त्यामुळे रुग्णांना आर्थिक फटका बसत असतो. त्यामुळे बस सेवेची गरज होती. तशी मागणी रुग्णालय प्रशासनाने एनएमएमटी प्रशासनाकडे केली होती. गेल्या दीड वर्षापासून या बस सेवेसाठी प्रयत्न सुरू होते. महापालिका आयुक्त अभिजित बांगर व एनएमएमटीचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी याची दखल घेत या मार्गाचे सर्वेक्षण केले होते. त्यानुसार 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी रुग्णालयाचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, उपसंचालक डॉ. नवीन खत्री, डॉ. प्रसन्न व्यंकटा, डॉ. राजेश दीक्षित, डॉ. पंकज चतुर्वेदी आणि एनएमएमटीचे मुख्य वाहतूक अधिकारी अनिल शिंदे उपस्थित होते.
सुरुवातीला तीन फेर्या
हा मार्ग क्रमांक 54 असून खारघर स्टेशन ते टाटा रुग्णालय असा आहे. एकूण 6.2 किलोमीटर अंतर असून खारघर स्टेशन- हिरानंदानी कॉम्प्लेक्स, घरकुल, रघुनाथ विहार, शिल्प चौक, जलवायू कृष्ण मंदिर, सेंट्रल पार्क, पांडव कडा व टाटा रुग्णालय असे थांबे देण्यात आले आहेत. बस थेट टाटा रुग्णालय आवारात थांबणार असून लवकरच येथे बस थांबा उभा करण्यात येणार आहे. सुरुवातीला तीन फेर्या होणार असून यात वाढ करण्यात येणार आहे.