Breaking News

भारत गॅसचा कर्मचारी असल्याचे सांगून सात लाखांची फसवणूक

पनवेल : वार्ताहर

एलपीजी गॅसची डिस्ट्रिब्युटरशिप न देता आकुर्ली येथे राहणार्‍या 48 वर्षीय महिलेची तब्बल सात लाख 31 हजार शंभर रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षी पार्क, आकुर्ली येथे राहणार्‍या संगीता फापाळे यांनी एलपीजी गॅस डिस्ट्रिब्युटरसाठीची जाहिरात वाचली होती. त्यानंतर त्यांनी ऑनलाइन अर्ज भरला. या वेळी सेल्स ऑफिसर सुरज आहिवले यांनी त्यांना कागदपत्रे पाठवण्यास सांगितले व ऑनलाईन अर्ज भरून 21 हजार 300 रुपये बँकेत भरायला सांगितले. फापाळे यांनी त्यांची कागदपत्रे पाठवली व पैसे बँकेत भरले. त्यानंतर सर्टिफिकेटची फी 97 हजार 300 रुपये भरण्यास सांगितले. 5 जानेवारी 2021 रोजी सुरज यांनी व्हाट्सअ‍ॅप मेसेज व मेलवर भारत गॅस डिस्ट्रिब्युटरचे सर्टिफिकेट पाठवले. या वेळी फापाळे यांनी ग्रामीण भागाचे सर्टिफिकेट हवे आहे असे सांगितले. तेव्हा सुरज आहिवले यांनी भारत गॅसचे डिपॉझिट म्हणून पाच लाख रुपये व कमीत कमी 650 गॅसच्या टाक्या घ्यावे लागतील असे सांगितले व प्रत्येक टाकी साडेआठशे रुपये प्रमाणे पडेल व टाकीचे डिपॉझिट म्हणून पाच लाख 55 हजार दोनशे रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यानुसार फापाळे यांनी डिपॉझिटचे पाच लाख व उर्वरित 94 हजार ही रक्कम गॅस सिलेंडर टाकीसाठी डिपॉझिटची रक्कम म्हणून बँक खात्यात भरली. त्यापुढे गॅस टाकी, ऑफिस गोडाऊनचे बांधकाम यासाठी जे पैसे भरायचे होते त्यासाठी बँकेकडून कर्ज मिळवून देण्यासाठी सुरज यांना सांगितले, मात्र त्यांनी कंपनीच्या मीटिंगमध्ये असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. संगीता फापाळे यांनी सुरज यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे संगीता फापाळे यांनी भारत गॅसचे हेड ऑफिस, मुंबई येथे चौकशी केली असता सुरज नावाचा कोणीही कर्मचारी त्यांच्याकडे काम करत नसल्याचे समजले. या वेळी त्यांनी भारत गॅस बँक खाते दाखवले असता ते भारत गॅसचे बँक खाते नसल्याचे समजले. या वेळी फसवणूक झाल्याचे फापाळे यांच्या लक्षात आले. भारत गॅसचा कर्मचारी आहे असे भासवून भारत गॅस ऑनलाइन वेबसाईटवर जाऊन अर्ज करण्यास सांगून एलपीजी डिस्ट्रिब्युटरशिप देतो असे सांगून फापाळे यांची सात लाख 31 हजार शंभर रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply