Breaking News

प्रतिकूल वातावरणावर मात करून अमित खत्रीचे रूपेरी यश

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

अमित खत्रीने जागतिक युवा (20 वर्षांखालील) अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमधील 10 हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेमधील भारताचे हे दुसरे पदक ठरले. समुद्रसपाटीपासून 1800 मीटर उंचीवर हे स्पर्धेचे ठिकाण असल्यामुळे तेथील वातावरणाचा अमितच्या कामगिरीवर परिणाम जाणवला. शर्यतीदरम्यान त्याला श्वासोच्छ्वासाचीही समस्या जाणवत होती, पण तरीही कारकीर्दीतील पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अमितने हे यश मिळवले. राष्ट्रीय विक्रमवीर 17 वर्षीय अमितने 42 मिनिटे, 17.94 सेकंद अशी वेळ देत रौप्यपदक जिंकले. सुवर्णपदक विजेत्या केनियाच्या हेरिस्टोन वॅनयोनीने 42 मिनिटे, 10.84 सेकंद अशी वेळ नोंदवली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी 4 बाय 400 मीटर मिश्र रीले शर्यतीत भारताने कांस्यपदक पटकावले होते. नऊ हजार मीटर अंतरापर्यंत अमित आघाडीवर होता, परंतु उर्वरित दोन टप्पे बाकी असताना वॅनयोनीने त्याला मागे टाकत वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह सुवर्णपदक प्राप्त केले. स्पेनच्या पॉल मॅकग्राला (42 मिनिटे, 26.11 सेकंद) कांस्यपदक मिळाले. जानेवारी महिन्यात झालेल्या फेडरेशन चषक कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत रोहतकच्या अमितने 40 मिनिटे, 40.97 सेकंद या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह सुवर्णपदक मिळवले होते. ती वेळ गाठण्यात त्याला अपयश आले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply