Breaking News

गुन्ह्यांत हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादींना दिला परत

पनवेल : वार्ताहर

नवी मुंबई पोलिसांनी विविध गुह्यांचा छडा लावून परत मिळविलेला सुमारे एक कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात 41 फिर्यादींना परत करण्यात आला. या वेळी पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, अप्पर पोलीस आयुक्त महेश धुर्ये, परिमंडळ-1चे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त, भरत गाडे, तसेच परिमंडळ-1 मधील सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी उपस्थित होते. या वेळी चोरीस गेलेला ऐवज परत मिळालेल्या नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करून त्यांचे आभार मानले.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-1 अंतर्गत असलेल्या 10 पोलीस ठाण्यात मागील वर्षात दाखल असलेल्या विविध गुह्यांचा पोलिसांनी उत्कृष्टरीत्या तपास करून चोरीस गेलेला, तसेच फसवणूक केलेली मालमत्ता हस्तगत केली. गेल्या वर्षभरामध्ये परिमंडळ-1 मधील विविध पोलीस ठाण्याकडून सुमारे एक कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल परत मिळविला आहे. हाच मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यासाठी सोमवारी वाशीतील साहित्य मंदिर सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांच्या हस्ते 41 फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला. या कार्यक्रमात सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम, मोटार वाहन व इतर वस्तू फिर्यादींना परत करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने चेन स्नॅचिंग, घरफोडी, चोरी, तसेच फसवणूक यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. या वेळी फिर्यादींना त्यांच्या मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply