कामोठे : रामप्रहर वृत्त
गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणरायाचे आगमन आणि विसर्जन मार्गाची पाहणी पनवेल मनपा नगरसेवक विजय चिपळेकर आणि क प्रभाग समिती माजी सभापती नगरसेवक दिलीप पाटील यांनी कामोठे वॉर्ड ऑफिसर अरविंद पाटील यांच्यासोबत केली. या वेळी पर्यावरणपूरक विसर्जन सोहळ्यासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक विजय चिपळेकर यांनी केली.
या वेळी कामोठे गाव प्रवेश द्वार क्रमांक 6, सेक्टर 14 या ठिकाणी सांडपाणी व वाहिनी खराब झाल्यामुळे घाणेरडे पाणी रस्त्यावर येत होते. म्हणून तत्काळ सिडकोचे अधिकारी उपअभियंता दीपक सिंग यांना बोलावून घेऊन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले व तत्काळ काम पूर्ण करून घ्यायला भाग पाडले. या वेळी चिपळेकर यांनी स्वखर्चाने जेसीबी मागवून काम करून घेतले. नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या तत्परतेने सांडपाणी आणि घाणेरडा वास यापासून सुटका होईल म्हणून परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
त्यानंतर कामोठे येथील सेक्टर 6 आणि जवाहर इंडस्ट्रियल एरिया लगतच्या विसर्जन तलावाची पाहणी करण्यात आली. या तलावाचे पाणी खूपच दूषित झालेले असल्याने अशा घाणेरड्या पाण्यात गणरायाचे विसर्जन करणे हे उत्सवाचे पावित्र्य भंग करणारे ठरेल म्हणून कामोठे येथील जवाहर इंडस्ट्रियल एरिया लगतच्या तलावात गणपती विसर्जनास मनाई करावी आणि पर्यावरणपूरक विसर्जन सोहळ्यासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक विजय चिपळेकर यांनी केली.
या पाहणी दौर्यात नगरसेवक विजय चिपळेकर, दिलीप पाटील यांच्या सोबत काकासाहेब कुत्तरवाडे, अतुल गोवारी, रवी गोवारी, सचिन पेटकर आदी कार्यकर्ते होते.