कर्जत : प्रतिनिधी
नगरपरिषद क्षेत्रातील दहिवली विभागातील रस्ते, पाणी पुरवठा आदी समस्यांसाठी दहिवली परिसर विचार मंचच्या सदस्यांनी मुख्याधिकार्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली. मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला नगरसेवक संकेत भासे, अभिषेक सुर्वे, माजी नगरसेवक प्रविण गांगल, विकास चित्ते, सुनिल जाधव, जयवंत म्हसे, सुदेश देवघरे, नंदकुमार गुरव, दिनेश कडू, नयनेश दिघे, संदेश गुरव, संजय वरघडे, शेखर मेढी व प्रशासनाने वतीने सुदाम म्हसे उपस्थित होते. दहिवली गाव परिसर विचारमंच समुहाकडून मागणी केल्या प्रमाणे मा. मुख्याधिकारी गारवे यांनी दहिवली गावासाठी स्वतंत्र पाण्याची साठवणूक टाकी बांधणे बाबत माहिती दिली. यावेळी माजी नगरसेवक गांगल यांनी आपल्या अभ्यासपूर्ण चर्चेत पाण्याची टाकी, त्यासाठी लागणारी जागा, येणा-या अडचणी , वाढती लोकसंख्या व दहिवली ग्रामस्थांची मागणी व गरजे बाबतची माहिती दिली. उपस्थित सर्वांनाच आप – आपली मते मांडली व हा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी प्राधान्य देणेबाबत आग्रही भूमिका मांडली. नगरसेवक भासे यांनी याबाबत येणार्या तांत्रिक व प्रशासकीय बाबींचा उल्लेख करुन नगरपालिकेच्या सभेमध्ये हा विषय घ्यावा अशी सुचना वजा विनंती केली. गांगल आणि भासे यांनी टाकी बांधणेसाठी काही जागा सुचविल्या व ती जागा बघून निर्णय घ्यावा असे सूचित केले. अभिषेक सुर्वे यांनी आमदारांचे वतीने आवश्यक निधी उपलब्ध करून देणे बाबत आश्वासित केले. यावेळी रस्त्यांबाबतही चर्चा झाली.