पुण्यामध्ये घंटानाद आंदोलन
पुणे : प्रतिनिधी
राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात यावी, या मागणीसाठी दोन दिवसापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कसबा गणपती मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. त्या पाठोपाठ आता ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी मंदिराबाहेर मनसेने घंटानाद आणि आरती करून आंदोलन केले.
राज्य सरकारने लवकरात लवकर मंदिरे खुली न केल्यास, आम्ही मनसेच मंदिरे उघडेल, असा इशारा मनसे शहर अध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. यावेळी मंदिरातील ‘देव बोले, उघडा दार उद्धव आता उघडा दार उद्धवा’, ’उद्धवा अजब तुझे सरकार!’, ‘आई राजा उदो उदो बिघाडी सरकारला उठव’,असे फलक घेऊन कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. तर यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, कोरोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे राज्यातली मंदिरे दीर्घकाळापासून बंद आहेत. ही मंदिरे येत्या आठ दिवसांत उघडावीत, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेत राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने केली होती.