\
पनवेल : रामप्रहर वृत्त
गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकाराद्वारे नागरिकांची फसवणुक होत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात वाढल्या आहेत. कोरोना, लॉकडाऊन आणि जीवनमानासह प्रत्येकाच्या मानसिकतेवर झालेला परिणाम याबाबींमुळे व्यक्ती फसवणुकीचा शिकार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच कोरोना काळात झालेली आर्थिक हानी यामुळे तरुणपीढी झटपट पैसे कमविण्याच्या उद्देशाने गुन्हेगारीच्या मार्गावर जात आहे. त्यामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये बरीच वाढ झाली आहे. अशा घटनांचा शोध घेत आरोपीला पडकणे पोलिसांसमोर आव्हान आहे.
खांदेश्वर पोलीस ठाण्यात नुकत्याच तीन फसवणुकीच्या तक्रारी दाखल झाल्या. यामध्ये पहिल्या घटनेत बुकिंग करता सात लाख 44 हजार रुपये घेऊन रूम न दिल्या प्रकरणी पद्मावती बिल्डर्स आणि डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक विकास हिराजी म्हात्रे, विद्या प्रकाश प्रेमप्रकाश सिंग व बाळकृष्ण सिनारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेक्टर 3 नवीन पनवेल येथे राहणारे मन्सूर शब्बीर मुलानी हे महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेत काम करतात. पद्मावती बिल्डर्स आणि डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक विकास म्हात्रे, विद्या प्रकाश सिंग व बाळकृष्ण सिनारे यांनी मन्सूर यांच्याकडून शिलोत्तर राईचुर येथील चार गुंठे मध्ये सुरू असलेल्या बालाजी मीडोस नियोजित बिल्डिंगच्या बुकिंग करता एकूण सात लाख 44 हजार दोनशे पन्नास रुपये घेतले. या प्रोजेक्टमध्ये तिघांना फक्त व्यवस्थापक म्हणून काम दिले असताना आणि त्यांना बिलकन प्रायव्हेट लिमिटेड यांनी कोणतीही बुकिंग करण्याची परमिशन दिलेली नसताना फसवणूक करण्याकरता मन्सूर यांच्याकडून बुकिंग करता रक्कम घेण्यात आली. ती रक्कम परत मागितली असता मन्सूर मुलानी यांना रक्कम परत दिली नाही. व त्यांची फसवणूक केली.
दुसर्या घटनेते जुन्या सोन्याचे दागिने घेऊन चांगल्या प्रतीचे नवीन दागिने बनवून देतो असे सांगून 29 वर्षीय महिलेची एक लाख 94 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सेक्टर 10, नवीन पनवेल येथे राहणारे मनाली पवार या नवीन पनवेल येथील सुखकर्ता ज्वेलर्स येथे सोन्याचे दागिने बनविण्यासाठी गेल्या होत्या. या वेळी त्या दुकानात असणारे मोरे यांनी त्यांना जुने सोने असेल तर जमा करा व नवीन सोने खरेदी करा, तुम्हाला चांगल्या प्रतीचे सोन्याचे दागिने बनवून देतो असे सांगितले. या वेळी मनाली पवार यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला व त्यांच्याजवळ असलेले जुने सोने त्यांना दिले. त्यानंतर दागिने मिळण्याबाबत त्यांना वारंवार सांगितले असता टाळाटाळ करून रक्कम दिली नाही. त्यामुळे पवार यांनी पैसे परत मागितले या वेळी त्यांनी चेक दिला. तो चेक बाउन्स झाला. त्यानंतर मोरे यांचे दुकान बंद असल्याचे समजतातच फसवणूक झाल्याचे लक्षात असल्यावर पवार यांनी मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
तिसर्या घटनेत स्वस्तात जिओ कंपनीचे व्हीआयपी सिम कार्ड नंबर देतो असे आमिष दाखवून एक लाख सत्तर हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. सेक्टर 9 वाशी येथे राहणारे प्रकाश कृष्ण ओंबळे यांचा किरण टेलिकॉम या नावाने आयडिया गॅलरी चालविण्याचा व्यवसाय नवीन पनवेल येथे आहे. त्यांनी देवराज यादव याना संपर्क करून व्हीआयपी सिमकार्ड हवे असल्याचे सांगितले. या वेळी त्याच्याकडे स्वस्त किमतीमध्ये कोणत्याही मोबाइल कंपनीचे व्हीआयपी नंबरचे सिमकार्ड एक लाख 70 हजार रुपयांमध्ये मिळू शकते असे सांगितले. या वेळी त्याच्यावर विश्वास ठेवून प्रकाश यांनी देवराज यादव यांना सिमकार्ड पोटी एक लाख 70 हजार रुपये दिले. त्यानंतर त्यांनी बर्याच वेळा सिमकार्डची मागणी केली. याबाबत फोन केला असता कंपनीसोबत बोलणे सुरू असून उद्या सिम कार्ड आणून देतो असे सांगण्यात आले. काही दिवसांनी प्रकाश यांनी पैसे परत मागण्यास सुरुवात केली. मात्र पैसे परत मिळाले नाहीत. आपली फसवणूक झल्याचे लक्षात येताच प्रकाश कृष्णा ओंबळे यांनी देवराज यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.