Breaking News

संबंध अजून तुटण्याआधी भाजपशी जुळवून घ्यावे; शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचे उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई ः प्रतिनिधी

राज्यात एकीकडे काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात असताना दुसरीकडे शिवसेनेमधून भाजपसोबत पुन्हा युती करण्यासाठी मागणी केली जात आहे. त्या संदर्भातील पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केले जात असताना सरनाईक यांच्या या ‘लेटरबॉम्ब’मुळे ते प्रश्नचिन्ह अधिकच मोठे झाले आहे. या पत्रामध्ये प्रताप सरनाईक यांनी मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. या परिस्थितीमध्ये जे राजकारण सुरू आहे त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असतील, आपला पक्ष कमकुवत करीत असतील, तर पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी या पत्रामध्ये युती तुटल्यानंतरही नेत्यांशी संबंध चांगले असल्याचे नमूद केले आहे. पुढील वर्षी मुंबई, ठाणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. राज्यात आपली युती तुटल्यानंतरही नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी जुळवून घेतलेले बरे होईल. त्याचा फायदा आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेला भविष्यात होईल, असेदेखील या पत्रामध्ये सरनाईक यांनी म्हटले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी आघाडी?

काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी आपण आघाडी केली का, असा प्रश्न शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रातून विचारला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असे त्या पक्षांच्या लोकांना वाटत आहे. काँग्रेसने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते फोडत असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीतील काही मंत्री-नेते केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठीशी लागू नये म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षासोबत छुपी हातमिळवणी करीत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे लगेच होतात, पण आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेनेच्या आमदारांची कामे होत नाहीत, अशी तक्रारही सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply