Tuesday , February 7 2023

रोहा बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

रोहे : प्रतिनिधी

 गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. या उत्सवासाठी लागणार्‍या सर्व साहित्याची खरेदीसाठी रोहा बाजारपेठेत गुरुवारी (दि. 9)नागरिकांची तुडुंब गर्दी झाली आहे. या गर्दीत कुठेही कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याचे दिसून आले आहे.

गणेशोत्सवासाठी रोहा तालुक्यात चाकरमानी मोठ्या प्रमाणात आले आहेत. रोहा ही तालुक्याची मुख्य बाजारपेठ आहे. तालुक्यातील मेढा, यशवंतखार, चणेरा, घोसाळे, खांब, देवकाने, धाटाव, भालगाव, विरजोली, तांबडी या गावांसह नागोठणे, कोलाड या भागातील नागरिक गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी आल्याने रोहा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.

रोहा बाजारपेठ ही गणेशोत्सवाच्या साहित्याने फुलली असून हे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. गणरायासमोर ठेवण्यासाठी लागणारी फळे व अन्य प्रसादाचे साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी गर्दीत केली होती. डेकोरेशन साहित्य, विद्युत रोषणाईसाठीचे साहित्य, मखर खरेदी करण्यासाठी गणेशभक्त बाजारात मोठ्या प्रमाणात आले होते. त्यामुळे रोहा बाजारपेठेतील सर्वच रस्ते आज गजबजलेले दिसून आले. शहरातील तीनबत्ती नाका, एसटी स्टँड परिसर, नगरपालिका कार्यालयासमोरील चौक, वीर सावरकर रोड आदी ठिकाणी अधूनमधून वाहतूक कोंडी होत होत होती.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र गुरुवारी बाजारपेठेतील गर्दीत बहुसंख्य नागरिक विनामास्क वावरत असल्याचे दिसून आले.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply