गाळे रिकामे दुकाने रस्त्यावर
महाड : प्रतिनिधी
दिवसेंदिवस वाढणार्या वाहनांमुळे महाड शहरात वाहतूक कोंडीला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. शहर वाहतूक पोलीस केवळ पावत्या फाडण्याचे काम करत आहेत तर नगरपालिका कर्मचारी बघ्याची भूमिका घेत असल्याने वाहतूक कोंडीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे.
महाडमध्ये वाढत चाललेली लोकसंख्या आणि त्यातून उद्भवणारी वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. ठोस उपाययोजना नसल्याने शहरातील वाहतुकीचे तीनतेरा वाजत आहेत. शहरातील प्रमुख मार्गालगत अवजड वाहने आणि दुकाने थाटल्याने नेहमीच वाहतूक कोंडी पहावयास मिळते. महाड शहरातील छत्रपती शिवाजी मार्ग, महात्मा गांधी मार्ग, सावित्री मार्ग या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावली जात असल्याने वाहतूक कोंडी होते. छत्रपती शिवाजी चौक ते वीरेश्वर मंदिर या मार्गात रस्त्यावर दुतर्फा विक्रेते बसत आहेत. लायन्स क्लबपासून बडोदा बँक आणि परिसर तसेच महावीर या दुकानांसमोर कायम वाहतूक कोंडी होत आहे. शिवाजी चौक ते चवदारतळे हा मार्ग अरुंद असल्याने आणि बँक ऑफ इंडियासमोर केली जाणारी पार्किंग वाहतुकीस अडथळा ठरत आहे.
शहरातील प्रमुख रस्ते, मुख्य बाजारपेठ आणि जोडमार्गावरील दुकानदारांकडून आपल्या दुकानातील सामान रस्त्यावर मांडून विक्री केली जाते. भाजी विक्रेते, फळ विक्रेतेदेखील दुकान गाळा रिकामा ठेवून फळे आणि भाज्या रस्त्यावर मांडून विक्री करत आहेत. हा प्रकार गेली अनेक वर्ष सुरु आहे.
शहरातील वाहतूक नियोजनावर वारंवार पोलीस प्रशासन बैठका घेते. सणासुदीला स्थानिक प्रशासन व्यापारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, राजकीय सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांना बोलावून सूचना ऐकून घेतल्या जातात आणि सण शांततेत पार पडले की पुन्हा जैसे थे स्थिती सुरु होते. कागदावर असलेले वाहतुकीचे नियोजन प्रत्यक्षात कृतीत येत नसल्याने शहरात येणारे पर्यटक देखील आश्चर्य व्यक्त करत आहेत.