नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील सर्वांत प्रतिष्ठित आणि दिग्गज उद्योजक रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळातील पंतप्रधान मोदींचे प्रयत्न हे वरवरचे आणि दिखावू नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. भारतीय वाणिज्य व उद्योग मंडळाच्या (द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंटस्ट्री ऑफ इंडिया-एएसएसओसीएचएएम) फाऊंडेशन वीक संमेलनात ते बोलत होते.
रतन टाटा म्हणाले, मी आजवरच्या व्यावसायिक कार्यकाळात साथीच्या आजाराची सर्वांत भयानक परिस्थिती यंदा पाहिली. महामारीचा काळ आणि देशाची आर्थिक पातळीवर घसरण झालेली असताना पंतप्रधानांनी केलेल्या कार्याचा मला आदर वाटतो. कारण या काळात तुमचे नेतृत्व अढळ राहिले, तुम्ही दुजाभाव केला नाही, तुम्ही जबाबदार्या झटकल्या नाहीत, तुम्ही पुढे राहून देशाचे नेतृत्व केले. तु्म्ही लॉकडाऊन लागू केला, काही मिनिटांसाठी तुम्हाला देशाने दिवे बंद करावे असे वाटत होते. तुम्ही यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. यामध्ये वरवरचे वाटणे आणि दिखाऊपणा नव्हता. देशाने एकत्र यावे हाच यामागील उद्देश होता.
कठीण काळात जर आपण सर्व जण एकत्र उभे राहिलो आणि आपण पंतप्रधान मोदींनी जे सांगितले त्याप्रमाणे वागलो, तर जग म्हणेल की या पंतप्रधानांनी जसे सांगितले तसे घडून आले, अशा शब्दांत टाटा यांनी पंतप्रधान मोदींचा गौरव केला.
Check Also
कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …