Thursday , March 23 2023
Breaking News

पुणे-पनवेल-पुणे रेल्वे सुरूच ठेवा अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे आंदोलनाचा इशारा

पनवेल : प्रतिनिधी

पनवेलपर्यंत विस्तार केलेली बारामती-पुणे पॅसेंजर सातत्याने किमान एक ते दीड तास उशिरा धावत असल्याची तक्रार पुणे-दौंड प्रवासी संघाचे सचिव विकास देशपांडे यांनी करून या गाडीचा पनवेलपर्यंतचा विस्तार रद्द करावा, अशी मागणी केली आहे, परंतु ही गाडी पनवेलहून उशिरा जात नाहीच, पण कर्जत येथेही 15 मिनिटांपेक्षा जास्त थांबत नसल्याने ती बंद करण्याची मागणी चुकीची असल्याने या गाडीचा विस्तार रद्द झाल्यास नवीन पनवेलमधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.  दौंडवरून सकाळी 7.05 वाजता सुटणारी दौंड-पुणे पॅसेंजर गाडी पुण्यात सकाळी 8.45 वाजता पोहचते. या गाडीचा 20 जानेवारीपासून विस्तार पनवेलपर्यंत केला आहे. पुण्यातून सकाळी 9.05 वाजता निघून दुपारी 1.40 वाजता पनवेल स्थानकात पोहचते. त्यानंतर पनवेलवरून दुपारी 2.25  वाजता पुण्यासाठी रवाना होते आणि सायंकाळी 6.10 वाजता पोहचते. हीच गाडी पुण्यातून सायंकाळी 6.45 वाजता बारामतीला सोडली जाते. पॅसेंजरचा विस्तार पनवेलपर्यंत केला तेव्हापासून आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस किमान एक ते दीड तास उशिरा सुटते. यामुळे दैनंदिन पुणे ते दौंड-बारामती प्रवास करणारे लोणी, मांजरी, उरुळी, यावत, खुतबाव, केडगाव, कडेठाण आणि पाटस या भागातील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. या मार्गावर या गाडीशिवाय इतर कोणतीही गाडी थांबत नाही. ही गाडी वेळेत धावणार नसेल तर तिचा विस्तार रद्द करावा, अशी मागणी दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघाचे सचिव विकास देशपांडे यांनी केली आहे. याबाबत पनवेल रेल्वे स्थानक प्रबंधक एस. एम. नायर यांच्याकडे चौकशी केली असता पनवेलहून सदर गाडी  सुरू केल्यापासून एखादा दिवसच 10-15 मिनिटे उशिरा गेली असेल. नाहीतर गाडी वेळेवर सुटते, असे सांगण्यात आले. त्यांनी 26 मार्च ते 31 मार्चपर्यंत गाडी सुटल्याच्या वेळेचा चार्ट दाखवून रोज गाडी  दुपारी 2.25 वाजता सुटल्याचे दाखवून दिले. कर्जत येथील स्टेशन प्रबंधक  यांच्याकडे चौकशी केली असता पाठीमागे  इंजीन जोडण्यासाठी  आम्हाला 10-15 मिनिटेच लागतात. आमच्याकडे गाडी थांबवून ठेवली जात नाही. या गाडीसाठी कर्जत येथे अनेक प्रवासी बाहेरून आलेले असल्याने गाडी लगेच सोडली जाते, असे सांगण्यात आले.

-गाडीचा पनवेलपर्यंत विस्तार केल्यामुळे उशीर होत असल्याची माहिती चुकीची असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तिचा पनवेलपर्यंतचा  विस्तार रद्द करावा, ही मागणी चुकीची असून असे झाल्यास पुण्याला जाणार्‍या ज्येेष्ठ नागरिकांचे हाल होतील. जर ही गाडी रद्द केली, तर आंदोलन केले जाईल.

-प्रकाश विचारे

अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष

…………………………………………………………………….

पनवेल येथून गाडी सुटल्यानंतर खंडाळ्याचा घाट चढण्यासाठी कर्जत येथे गाडीच्या पाठीमागे इंजीन जोडण्यात येते. हे इंजीन जोडण्यास सुमारे तासभर लागतो. त्यानंतर 15-20 मिनिटांनी गाडी सुटते. त्यामुळे पुण्यात येण्यास गाडीला विलंब होत आहे. या गाडीसाठी अनेक प्रवासी थांबून असतात, पण गाडी वेळेत येत नसल्याने प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे या पॅसेंजरचे दोन रॅक करून एक रॅक पुण्यात थांबवून वेळेत बारामतीला सोडण्यात यावा.

-हर्षा शहा, रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा

Check Also

सराईत सोनसाखळी चोरांना अटक

जवळपास पावणेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पनवेल : वार्ताहर खारघर, उलवेसह नवी मुंबई परिसरात …

Leave a Reply