Breaking News

कोकणासह सर्वत्र पावसाचा जोर कायम

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. रायगडमध्ये रविवारी (दि. 12) रात्रीपासून पाऊस सुरू आहे. कोयना, जायकवाडीसारख्या मोठ्या धरणांमधून विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेच्या तालुक्यांमध्ये घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस बरसत असून बहुतांश धरणे, प्रकल्प भरले आहेत. हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरवत रायगड जिल्ह्याच्या काही भागात रविवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. सकाळी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर दक्षिण रायगडमधील महाड, पोलादपूर तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसाने सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्याच्या अन्य भागात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत, मात्र काही भागात चक्क ऊन पडल्याचे पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाड इथे एनडीआरएफचे पथक तैनात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागातही जोरदार पाऊस सुरू आहे. विशेषतः भोर, वेल्हे तालुक्यातील घाटमाथ्यावर शंभर मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडला आहे. त्यामुळे स्थनिक प्रशासन आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज झाले आहे. कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग वाढवला असल्याची धरण व्यवस्थापनाने माहिती दिली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply