अलिबाग : प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी (दि. 13) रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थिती लावली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 23 ऑगस्टला महाड येथील पत्रकार परिषदेत केलेल्या आक्षेपार्ह विधान प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना महाड न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे राणे यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही अटी घातल्या होत्या. त्यात राणे यांनी अलिबाग येथील एलसीबी शाखेच्या कार्यालयात 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत हजर राहावे अशी अट होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे राणे 30 ऑगस्ट रोजी अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) कार्यालयात हजर होऊ शकले नव्हते. सोमवारी 13 सप्टेंबर रोजी ना. नारायण राणे यांनी रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थिती लावली. केंद्रीय मंत्री नारायण राणे सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहणार हे निश्चित झाल्यामुळे अलिबाग शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी 2.30 वाजता राणे पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाले. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार शाम सावंत, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, अलिबाग शहर अध्यक्ष अॅड. अंकित बंगेरा, अॅड. संग्राम देसाई, अॅड. संदेश चिकणे त्यांच्यासोबत होते.
न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी मी आज पोलीस अधीक्षक कार्यालयात आलो. कोणताही जबाब नोंदवला नाही. रायगड पोलिसांनी सहकार्य केले.
-नारायण राणे, केंद्रीय मंत्री