दुबई ः वृत्तसंस्था
कर्णधार के. एल. राहुलने (42 चेंडूंत नाबाद 98 धावा) साकारलेल्या तुफानी खेळीच्या बळावर गुरुवारी पंजाब किंग्जने इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जवर सहा गडी आणि 42 चेंडू राखून दणदणीत विजयाची नोंद केली, मात्र तरीही पंजाबचा संघ स्पर्धेबाहेर झाला आहे. चेन्नईने दिलेले 135 धावांचे लक्ष्य पंजाबने 13 षटकांत गाठल्यामुळे त्यांची निव्वळ धावगती मुंबईपेक्षाही सरस झाली आहे. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणार्यांच्या शर्यतीत अग्रस्थानी असलेल्या राहुलने (626) तब्बल सात चौकार आणि आठ षटकारांची आतषबाजी केली. तत्पूर्वी, फाफ ड्यू प्लेसिसच्या (55 चेंडूंत 76 धावा) झुंजार खेळीमुळे चेन्नईने 6 बाद 134 धावांपर्यंत मजल मारली. ऋतुराज गायकवाड (12), मोईन अली (0), अंबाती रायुडू (4) यांना छाप पाडता आली नाही. चेन्नईच्या पराभवामुळे बंगळुरूच्या अव्वल दोन संघांत मुसंडी मारण्याच्या आशा उंचावल्या आहेत. त्यामुळे चुरस दिसून येत आहे. संक्षिप्त धावफलक : चेन्नई सुपर किंग्ज ः 20 षटकांत 6 बाद 134 (फाफ ड्यू प्लेसिस 76; ख्रिस जॉर्डन 2/20, अर्शदीप सिंग 2/35) पराभूत वि. पंजाब किंग्ज : 13 षटकांत 4 बाद 139 (के. एल. राहुल नाबाद 98; शार्दूल ठाकूर 3/28).