Breaking News

जागतिक रंगभूमी दिन

27 मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. 1961मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटयूटने या दिवसाची सुरुवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला. जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने मराठी रंगभूमीची सद्यस्थिती, आव्हाने याचा ऊहापोह..

विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकाने मराठी रंगभूमीची सुरुवात झाली. 1843 मध्ये सांगली येथे मराठीतल्या या पहिल्या गद्य व संगीत नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. त्यानंतर मराठी रंगभूमीने वेगवेगळी वळणे घेतली. त्यातील एक महत्त्वूर्ण वळण म्हणजे संगीत रंगभूमी. मराठी रंगभूमीवर सादर झालेली संगीत नाटके मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ होता. ‘नाटक’ हे मराठी माणसाचे पहिले ‘वेड’ आहे असे म्हणतात ते चुकीचे नाही. चार मराठी माणसे एकत्र जमली की हमखास एखादे ‘नाटक’ सादर केले जातेच. मराठी रंगभूमीला सुगीचे दिवस येण्यापूर्वीच्या काळात लोकांसाठी मनोरंजनाचे माध्यम म्हणून पोवाडा, भारुड, कीर्तन, दशावतारी खेळ हीच मुख्य साधने होती. ‘नाटक’या कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभक्कम पाठबळ

दिले आणि रंगभूमी बहरली.

संगीत नाटकांची परंपरा मागे पडल्यानंतर सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, कौटुंबिक, विनोदी, फार्स, रहस्यमय अशा नाटकांनीही काही काळ गाजविला. नाटक म्हणजे खूप पात्रे असा समजही काही नाटकांनी खोटा ठरविला. मोजक्या पात्रांसह नाटकाचे प्रयोग होऊ लागले आणि त्यांना प्रेक्षकांचाही प्रतिसाद मिळाला. अगोदर चित्रपट, त्यानंतर खासगी दूरचित्रवाहिन्या आणि आता स्मार्ट भ्रमणध्वनी, इंटरनेट, संगणक यांच्या आक्रमणामुळे नाटक टिकणार का अशीही शंका रसिकांच्या मनात येत आहे. दररोजच्या मराठी वृत्तपत्रांतून नाटकांच्या येणार्‍या जाहिराती आणि होणारे प्रयोग हे चित्र सुखावह आहे. पण खरोखरच तशी परिस्थिती आहे का, तेच वास्तव आहे का, भारतातील अन्य प्रादेशिक भाषांमधील रंगभूमीपेक्षा मराठी रंगभूमी खरोखरच समृद्ध आहे का, बदलत्या काळात आणि परिस्थितीत टिकून राहील का, असे अनेक प्रश्न मनात

भेडसावीत आहेत.

राज्यभरात आजही विविध संस्थांतर्फे एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या जात असतात. एकांकीका स्पर्धेला महाविद्यालयीन तरुणांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अशा स्पधरामधून लेखन, दिग्दर्शन, अभिनय क्षेत्रांत आणि रंगभूमीच्या अन्य तांत्रिक विभागासाठीही नवी गुणवत्ता पुढे येण्यास मोलाची मदत होत आहे.

वृत्तपत्रांतून मराठी नाटकांच्या येणार्‍या जाहिराती पाहिल्या तर सगळी नाटके जोरदार व्यवसाय करत असतील असे वाटते. पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. काही नाटकांचा अपवाद वगळता अन्य नाटकांना चांगले बुकिंग मिळत नाही. एकेकाळी काही मातब्बर नाटयगृहातून दिवसातून मराठी नाटकांचे तीन-तीन प्रयोग होत असत. नाटयगृहाच्या बाहेर ‘हाऊसफुल्ल’ची पाटी झळकत असे. आता रविवार किंवा अन्य सुटीच्या दिवशीही अपवाद वगळता नाटक ‘हाऊसफुल्ल’ जात नाही, हे वास्तव आहे. नाटयगृहाची भरमसाठ भाडी, जाहिरातींचे वाढलेले दर, कलाकारांची ‘नाईट’, एकमेकांशी असलेली स्पर्धा, नाटकाचा निर्मिती खर्च आणि तुलनेत मिळणारे उत्पन्न, प्रेक्षकांचा प्रतिसाद, तरुण पिढीचे पाठ फिरविणे या चक्रव्यूहात आजचे मराठी नाटक सुरू आहे

काही नाटकांचा अपवाद वगळता नाटकाच्या प्रयोगाला 18 ते 25 या वयोगटांतील किती तरुणाई नाटक पाहायला येते, हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. तरुणांचे किंवा त्यांच्या विषयाशी संबंधित नाटक असेल तर तरुण वर्गाची नाटकाला गर्दी होते. अन्यथा नाटकाला येणारा बहुतांश प्रेक्षक हा 45-50 या  आणि त्यापुढील वयोगटाचाच आहे, असे चित्र पाहायला मिळते.

सध्याची तरुणाई ही स्मार्ट भ्रमणध्वनी, संगणक, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर यात गुरफटलेली आहे. या सगळ्या माध्यमांकडे शत्रू म्हणून न पाहता मित्र म्हणून पाहून त्याचा मराठी नाटकांच्या प्रसिद्धीसाठी तसेच तरुणाईला मराठी नाटकांकडे वळविण्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल यावरही विशेष भर दिला गेला पाहिजे. दैनंदिन जीवनात भेडसाविणारे प्रश्न आणि समाजात जे घडतंय त्याचे प्रतिबिंब मराठी नाटकांमधून उमटले गेले पाहिजे. काही नाटकांच्या माध्यमातून तसा प्रयत्न होत असला तरी ते प्रमाण कमी आहे.

नाटकांची संख्या आणि गुणवत्ता याचे प्रमाण नेहमीच विषम राहिलेले आहे. पण माहिती-तंत्रज्ञानाच्या युगातही अजूनही मराठी नाटक सुरू आहे, नवे रंगकर्मी पुढे येत आहेत ही नक्कीच आनंदाची बाब आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply