Breaking News

वसुली आली की ‘ससा’ होतो आणि शेतकर्‍यांना मदत म्हटली की ‘कासव’!; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा

मुंबई ः प्रतिनिधी
राज्यात अतिवृष्टीमुळे व पुराने नुकसान झालेल्या बहुतांश शेतकर्‍यांना अद्यापपर्यंत शासकीय मदत पोहचलेली नाही. यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. या सरकारमध्ये चाललेय तरी काय विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकर्‍यांना मदतीची प्रतीक्षा आहे. वसुली आली की या सरकारचा ‘ससा’ होतो आणि शेतकर्‍यांना मदत म्हटली की ‘कासव’, अशा शब्दांत फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुढे ट्विटमध्ये म्हटले की, मार्च, एप्रिल, मे 2021मध्ये अतिवृष्टी झाली, तर मदतीचा जीआर 6 ऑक्टोबर 2021 रोजी, जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली तर मदतीची प्रेसनोट 7 ऑक्टोबर 2021 रोजी. सहा-आठ महिने मदतीचे आदेश जर निघत नसतील तर प्रत्यक्ष मदत केव्हा पोहचणार? ‘वसुली’साठी धावणारे सरकार शेतकर्‍यांच्या मदतीसाठी का असे धडपडतेय? विदर्भ आणि मराठवाड्याच्या अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने आणि भरीव मदत जाहीर झालीच पाहिजे. एकरी 50 हजारांची मागणी करणारे आता हात का आखडता घेताहेत, असा सवालही फडणवीस यांनी केला आहे. मदतीचे आकडे तर त्याहून संतापजनक असे सांगत मार्च ते मे 2021 ः संपूर्ण रत्नागिरी जिल्हा 5.10 लाख, सिंधुदुर्ग जिल्हा 24 लाख, परभणी जिल्हा 25 लाख, हिंगोली 14 लाख, नांदेड 20 लाख, उस्मानाबाद 1.74 लाख, यवतमाळ 10 लाख, नागपूर 23 लाख, वर्धा 39 लाख, गोंदिया 26 लाख, चंद्रपूर 35 लाख रुपये फक्त, अशी आकडेवारीच फडणवीसांनी दिली आहे.

शेतकर्‍यांप्रति ‘नक्राश्रू’ ढाळणारे आता बंद पुकारतील काय?

फडणवीस यांनी आणखी एका ट्विटमध्ये जुलै 2021च्या मदतीची भरघोस घोषणा, अशी खोचक टिप्पणी करीत नागपूर विभागातील सहा जिल्हे मिळून फक्त 10 कोटी रुपये आणि संपूर्ण नाशिक विभागातील सर्व पाच जिल्हे मिळून फक्त एक लाख रुपये! म्हणजे एक जिल्हा फक्त 20 हजार रुपये! शेतकर्‍यांप्रति ‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘महाविकास’ नेते आता बंद पुकारतील काय, असा सवाल केला आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply