अलिबाग : प्रतिनिधी
राज्यात मराठी भाषा विकास प्राधिकरणाची स्थापना करावी आणि बारावीपर्यंत मराठी भाषेचा विषय अनिवार्य व्हावा, यासाठी मराठी शिक्षण कायदा करावा, अशी मागणी कोकण मराठी साहित्य परिषदे (कोमसाप)ने केली आहे. या संदर्भातील एक निवदेन कोमसापच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (दि. 26) रायगडच्या जिल्हाधिकार्यांना दिले.
राजभाषा असूनही मराठी भाषेचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. शिक्षणव्यवहारात, लोकव्यवहारात आणि शासनस्तरावर मराठीचे महत्त्व कमी होत चालले आहे. मराठी शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. दुसरीकडे इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढत आहे. मराठी भाषेवर इंग्रजीचे आक्रमण होत आहे. त्यामुळे पहिली ते बारावीमधील विद्यार्थ्यांसाठी मराठी विषय अनिवार्य करावा, यासाठी राज्यात मराठी शिक्षण कायदा पारित करावा आणि तो पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू करावा, अशी मागणी कोमसापने केली आहे.
मराठी भाषेचा वापर वाढावा, यासाठी मराठी भाषा विकास प्राधिकरणाची स्थापना करावी. तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटकसारख्या राज्यांनी अशी प्राधिकरणे स्थापन केली आहेत. महाराष्ट्रातही मराठी भाषेला राजाश्रय मिळावा आणि भाषावार प्रांतरचनेचे तत्त्व खर्या अर्थाने साकार व्हावे, अशी मागणीही कोमसापच्या वतीने करण्यात आली. या वेळी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या उत्तर आणि दक्षिण रायगड शाखांमधील पदाधिकारी आणि सदस्य या वेळी उपस्थित होते.