पनवेल ः प्रतिनिधी
भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यातून कळंबोली येथे सिडकोच्या वतीने साकारण्यात आलेल्या कोविड आरोग्य केंद्रांचे लोकार्पण शुक्रवारी (दि. 8) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात आले. या कार्यक्रमास नगर विकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, पनवेलच्या महापौर कविता चौतमल, खासदार श्रीरंग बारणे, खासदार मनोज कोटक, आमदार प्रशांत ठाकूर, सुनील राऊत, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे आदी डिजिटल माध्यमाद्वारे उपस्थित होते. या वेळी मुंबईतील कांजूरमार्ग येथील कोविड आरोग्य केंद्राचेही लोकार्पण झाले. कळंबोलीतील कोविड आरोग्य केंद्र कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या गोडाऊनमध्ये केंद्रात उभारण्यात आले असून ते पूर्णपणे वातानुकूलित आहे. यामध्ये एकूण 635 खाटा आहेत. त्यात 505 ऑक्सिजनयुक्त खाटा, 125 आयसीयू खाटा (यातील 25 आयसीयू खाटा लहान मुलांसाठी समर्पित आहेत), पाच खाटा या आपत्कालीन कक्षासाठी राखीव आहेत. याशिवाय अन्य कक्ष व सुविधा आहेत.