मुंबई ः प्रतिनिधी
प्रत्येक गोष्टीसाठी केंद्र सरकारलाच जबाबदर धरले जाणार असेल तर मग राज्य हे केंद्राच्या ताब्यात देऊन टाकावे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सचिन वाझे ‘वसुली’ सरकारच्या इतके जवळ होते की त्यांनी अधिवेशनात कित्येक तास त्यावर वाया घालवले. नऊ वेळेला विधानसभा स्थगित करावी लागली. म्हणजे केवढे ते प्रेम वाझेंवर, असा टोला पाटील यांनी लगावला. दरम्यान, एनआयए कोठडीत मी सचिन वाझे यांची भेट घेतल्याचा आरोप हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले आहेत, तसेच आठवीच्या विद्यार्थ्यालाही अनिल परब कसे सहभागी आहेत याची माहिती असेल, असे त्यांनी म्हटले.
मी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असे म्हणत नाही, पण आता तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू न करण्यासाठी काय शिल्लक ठेवले आहे, अशी विचारणा पाटील यांनी केली. अगदी 18 महिन्यांपूर्वीच्या सरकार स्थापनेपासून महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस निराशेकडे गेला आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस दलातील संघाशी संबंधित अधिकार्यांचा शोध घेतला जाईल या केलेल्या वक्तव्यावरून पाटील यांनी टीका केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना आहे का? लातूरचा भूकंप असो किंवा कोल्हापुरातील पूरपरिस्थिती प्रत्येकवेळी संघ मदतीसाठी धावला आहे. तुमच्या राजकीय वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ओढू नका, असे ते म्हणाले.
आणखी दोन मंत्र्यांचा राजीनामा
पुढील 15 दिवसांत राज्य सरकारमधील आणखी दोन मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची वेळ येईल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी या वेळी केला. पुढील 15 दिवसांत अजून दोन मंत्री राजीनामे देतील. मला नावे विचारू नका. कोणीतरी न्यायालयात जाईल आणि त्यानंतर अनिल परब यांना राजीनामा द्यावा लागेल, असे ते म्हणाले.
दोषींना मोक्का लावा
वाझे प्रकरणात राजीनामे होतील, चौकशी होईल, कदाचित एक वेळ अटकही होईल, पण यामुळे प्रश्न सुटणार नाहीत. ही संघटित गुन्हेगारी आहे आणि संघटित गुन्हेगारीला मोक्का कायदा लागतो. त्यामुळे आमची मागणी आहे की, या प्रकरणात पुरावे समोर आल्यास संबंधितांना मोक्का कायदा लावावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी या वेळी केली.
Check Also
खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …