अलिबाग ः प्रतिनिधी
कोरोना महामारीमुळे रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारके व स्थळे पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. आता कोरोनाविषयक नियमांचे पालन करून ती पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी त्यास मान्यता दिली आहे.
महाड तालुक्यातील अचलोल येथील सोनगड (सोनगिरी), अलिबाग तालुक्यातील आगरकोट येथील कॅथेड्रल, चौकोनी किल्ला किंवा चौलची फॅक्टरी, चर्च आणि कॉन्व्हेंट ऑफ द ऑगस्टीनियन्स, डॉमिनिकन चर्च आणि कॉन्व्हेंट, येसू ईस्ट चर्च आणि कॉन्व्हेंट, कोथी, एक बुरूज, सेंट फ्रान्सिस झेवियर्स चॅपल, सतखानी बुरूज, दोन दरवाजे, हिराकोट जुना किल्ला, कुलाबा किल्ला, कर्जत तालुक्यातील आंबिवली येथील लेणी, रोहा तालुक्यातील बिरवाडी येथील बिरवाडी किल्ला, अलिबागच्या चौल येथील बारबरचा महाल, दादर (जिना), कमान, मस्जिद, राजकोट, सरखेल कान्होजी आंग्रेंची समाधी, वाडा ऑफ डान्सिंग गर्ल, कोर्लई किल्ला, पोलादपूर तालुक्यातील ढवळा येथील चंद्रगड, उरण घारापुरी येथील एलिफंटा लेणी, घारापुरी येथील एलिफंटा बेटावरील प्राचीन विटांचे स्तूप, रोहा तालुक्यातील घेरा सुरगड येथील घेरीयागड किंवा सूरगड किल्ला, रोहा घोसाळे येथील घोसाळगड किल्ला, मेढे येथील अवचितगड, नागोठणे येथील ब्रिज, महाडमधील कडासरी कंगोरी येथील जुना किल्ला, लिंगाणा येथील डोंगर, कोल येथील कोल लेणी, सर्व्हे नंबर 49 व 50 मधील लेणी, पाचाड येथील जिजाऊ माता समाधी व वाडा, रायगड किल्ला, पाली येथील लेणी, गोमाशी येथील बौद्ध लेणी, नाडसूर येथील थनाला लेणी, सुधागडमधील नेनावली येथील खडसंबला लेणी, कर्जतमधील कोंडाणे लेणी, पेठ येथील कोटाली किल्ला व लेणी, माणगावमधील कुडा येथील कुडा लेणी, मुरूड येथील कसा (कमसा) किल्ला, राजापुरी येथील जंजिरा किल्ला, खोळकरनजीक घुमज येथील कबर, तळा येथील किल्ला या ठिकाणी जाण्यास कोविड-19 प्रादूर्भावामुळे पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. आता ही स्थळे खुली करण्यात आली आहेत.
पर्यटकांसाठी रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारके व स्थळे खुली करण्यात आली आहेत. पर्यटकांनी येथे पर्यटनाला जरूर यावे, मात्र शासनाने कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे.
-डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी, रायगड