अलिबागच्या प्रसिद्ध पांढर्या कांद्याला केंद्र सरकारने भौगोलिक मानांकन (जीआय) देण्यास मान्यता दिली आहे. यामुळे या कांद्याला आता वेगळी ओळख मिळेल. अलिबाग तालुक्यातील शेतकर्यांना आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कांद्याला देशासह जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवणे शक्य होणार आहे. या मानांकनामुळे पांढर्या कांद्याला वेगळी ओळख मिळेल, हे खरं आहे. परंतु शेतकर्यांना त्याचा फायदा काय. मानांकन मिळाले, पण पुढे काय. आता पांढर्या कांद्याचे उत्पादन आणि उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करणे, लागवडीचे क्षेत्र वाढवणे, मार्केटिंगसाठी कांदा उत्पादक शेतकर्यांची वैयक्तिक नोंदणी करून घेणे यासाठी प्रयत्न करावे लागतील.
अलिबाग तालुक्यातील नेहुली, खंडाळे या गावांमध्ये पांढर्या कांद्याचे पीक घेतले जात असे. त्यानंतर तालुक्यात काही गावांतील शेतकरी पांढर्या कांद्याची लागवड करू लागले. वाढती मागणी आणि चांगला भाव यामुळे सध्या अलिबागसह मुरूड, रोहा, पेण, माणगाव, महाड, तळा आणि कर्जत तालुक्यात पांढरा कांदा लागवड होत आहे. असे असले तरी अलिबाग तालुक्यातील पांढर्या कांद्याला वेगळी चव आहे. त्यामुळे त्याची वेगळी ओळख आहे.
नाशिक, पुणे जिल्ह्यात, तसेच पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये पांढर्या कांद्याची लागवड केली जाते, मात्र इतर जिल्ह्यात होणार्या पांढर्या कांद्यापेक्षा अलिबागच्या पांढर्या कांद्याचे गुणधर्म वेगळे आहेत. अलिबामध्ये होणारा पांढरा कांदा तिखट नसतो. त्यात औषधी गुणधर्म आहेत. या कांद्यात मिथाईल सल्फाईड आणि अमिनो अॅसिड असते. हे कोलेस्टेरॉलही नियंत्रणात ठेवते, तसेच हृदयाच्या तक्रारींपासूनही दूर ठेवते. रोज कांदा खाल्ल्याने रक्ताची कमतरताही दूर होते. अॅनिमियाही दूर होतो, असे जाणकार सांगतात. जर सर्दी किंवा कफाची समस्या असेल, तर ताज्या कांद्याच्या रसात गुळ व मध टाकून प्यायल्यास ही समस्या दूर होते. रोज कांदा खाल्ल्याने इंशुलिन निर्माण होते. असा हा अलिबागचा पांढरा कांदा औषधी आहे.
इतर कांदे व अलिबागचा पांढरा कांदा यांच्या गुणधर्मात फरक काय आहे, हे जाणून घेण्यासाठी अलिबागमधील पांढर्या कांद्याचे भौगोलिक मानांकन करण्याचे रायगड कृषी विभागाने ठरविले. त्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शस्त्रज्ञांना अभ्यास करण्यास सांगण्यात आले. मानांकन मिळविण्यासाठी 15 जानेवारी 2019 रोजी नोंदणी करण्यात आली होती.
29 सप्टेंबर 2021 रोजी केंद्र सरकारने अलिबागच्या पांढर्या कांद्याला भौगोलिक मानांकन देण्यास मान्यता दिली. अलिबागची खारी हवा आणि येथील जमिनीमध्ये सल्फरचे प्रमाण कमी असल्यामुळे या कांद्यात तिखटपणा कमी आहे. या वेगळेपणामुळे आलिबागच्या पांढर्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
रुचकर व औषधी गुणधर्मामुळे अलिबागचा पांढर्या कांद्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे काही व्यापारी इतर जिल्ह्यातील पांढरा कांदा आणून तो अलिबागचा आहे, असे सांगून विकतात. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते. आता भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे अलिबागचा आहे, असे सांगून परजिल्ह्यातील पांढर्या कांद्याची विक्री थांबविण्याचा हक्क येथील शेतकर्यांना मिळाला आहे. आता अलिबागच्या पांढर्या कांद्याला एक चिन्ह मिळेल. हे चिन्ह लावून अलिबागचे शेतकरी आपला पांढरा कांदा विकू शकतील. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक थांबेल, हे खरं आहे, परंतु हे मानांकन मिळवण्यासाठी कांदा उत्पादक शेतकर्यांची जीआय संस्थेकडे वैयक्तिक नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कृषी विभागाने त्यासाठी पावले उचलायला हवीत.
पांढरा कांदा भरपूर उत्पन्न देणारे पीक आहे, परंतु त्याची लागवड अलिबाग तालुक्यातील 250 हेक्टर क्षेत्रावरच होते. मानांकन मिळाल्यामुळे अलिबाच्या पांढर्या कांद्याला मागणी वाढेल, परंतु तेवढे उत्पादन नसेल, तर पुरवठा करता येणार नाही.
भौगौलिक मानांकन मिळाल्यानंतर आता पांढर्या कांद्याच्या उत्पादन वाढीसाठी क्षेत्रवाढ होणे आवश्य आहे, तसेच कांद्याच्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागणार आहे. हल्ली सेंद्रिय पद्धतीने उत्पादीत केलेल्या मालाला ग्राहकांची पसंती असते. त्यामुळे अलिबागच्या पांढर्या कांद्याची सेंद्रिय पद्धतीने उत्पादकता कशी वाढवता येईल, यासाठीही अभ्यास करावा लागणार आहे. हा कांदा जास्त दिवस टिकला पाहिजे. त्यासाठी काढणीपश्चात कांदा जास्त दिवस कसा टिकेल, यावरही संशोधन करायला हवे.
उत्पादन वाढले तरी त्यांची विक्री होणे आवश्यक आहे. शेतकर्यांनी कांद्याचे जास्त उत्पादन घेतले तर कांदा पडून राहता कामा नये, तो विकला गेला पाहिजे. या कांद्याला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
अलिबागच्या पांढर्या कांद्याची लागवड भात कापणीनंतर केली जाते. साधारण तीन महिन्यांनंतर तो काढून विक्रीस बाजारात आणला जातो. त्यापूर्वी इतर जिल्ह्यामध्ये उत्पादित होणरा पांढरा कांदा बाजारात आलेला असतो. पूर्वी परजिल्ह्यातून येणारा पांढरा कांदा सुटा असायचा. अलिबागचा कांदा माळ करून विकला जातो.
आता परजिल्ह्यातून येणारा पांढरा कांदादेखील माळ करूनच बाजारात आणला जातो. विक्रेते हा इतर जिल्ह्यात उत्पादीत होणारा कांदा अलिबागचा पांढरा कांदा म्हणून विकतात. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक तर होतेच शिवाय अलिबाग तालुक्यातील शेतकर्याचेदेखील नुकसान होते. आलिबागचा कांदा उशिरा बाजारात आल्यामुळे त्याला दर मिळत नाही. ही फसवणूक कशी थांबवता येईल. यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. हे केवळ शासन करू शकणार नाही. त्यासाठी कांदा उत्पादक शेतकर्यांनीदेखील प्रयत्न करायला हवेत.
-प्रकाश सोनवडेकर, खबरबात